Monday, September 16, 2019

डॅशिंग उदयनराजे भोसले


उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज. डॅशिंग उदयनराजे म्हणून त्यांची सातार्याबरोबरच अख्ख्या महाराष्ट्रात ओळख आहे. त्यांची आज चर्चा व्हायचे कारण म्हणजे त्यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून खासदार झाले होते. त्यांचा राजकीय प्रवासही नेहमीच चर्चेचाच राहिला आहेखासदार उदयनराजे भोसले 1991 साली पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी काका अभयसिंह राजेंच्या विरोधात स्वत:चं पॅनेल उभं केलं. स्वत: दोन वॉर्डातून उभे राहिले. इथे ते एका वॉर्डातून निवडून आले आणि एकात त्यांचा पराभूत झाले. 1991 ते 1996 असे पाच वषर्ं ते नगरसेवक होते. 1996 मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली. त्यावेळी काँग्रेसचे प्रतापराव भोसले सातार्याचे खासदार होते.

विद्यमान खासदार असल्यामुळे प्रतापरावांची उमेदवारी कापणं शक्य नव्हतं. परंतु प्रतापरावांच्या पराभवाची व्यूहरचना आखण्यात आली होती, असं म्हणतात. त्यासाठी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी अनेक समविचारी उमेदवार उभे करण्याची खेळी करण्यात आली. उदयनराजे भोसले, पार्थ पोळके, आर. डी. निकम यांच्याशिवाय आणखी दोघे-तिघे तसे उमेदवार होते. त्याचा परिणाम असा झाला की, बारा हजार मतांनी शिवसनेच्या हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी प्रतापरावांचा पराभव केला. यानंतर 1998ला लोकसभेची निवडणूक झाली. त्यात अभयसिंहराजे सातार्याचे आमदार असतानाही लोकसभेला उभे राहिले आणि निवडून आले. यामुळे मग सातारा विधानसभेची जागा मोकळी झाली आणि तिथं पोटनिवडणूक लागली. विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी उदयनराजे यांच्यासमोर खुद्द अभयसिंहराजे यांचं आव्हान होतं. मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजेंविरुद्ध फिर्याद देण्यात आली. ही बातमी वार्यासारखी पसरली आणि त्यांना अटक झाली. ते 22 महिने जेलमध्ये होते. नंतर उदयनराजेंची यातून निर्दोष मुक्तता झाली. पण, या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम झाला आणि उदयनराजेंचा पराभव झाला. 2001ला ते जेलमधून बाहेर आले आणि सातारा नगरपालिकेची निवडणूक मोठया फरकाने जिंकले. नगरपालिकेतील 39 पैकी 37 जागा त्यांनी जिंकल्या. 2004 ला अभयसिंहराजेंचे निधन झाले. मग तेव्हाची निवडणूक शिवेंद्रराजे विरुद्ध उदयनराजे अशी झाली. या निवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला आणि शिवेंद्रराजे आमदार म्हणून निवडून आले. उदयनराजे यांना सातार्यात महाराज या नावाने ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असल्याचा त्यांना अभिमान आहे. त्यांच्या भाजपप्रवेशाने त्यांचे कार्यकर्ते जाम उत्साहित आहेत. मात्र त्यांनी अचानक भाजपची वाट का धरली असेल, याची खुमासदार चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment