Monday, September 16, 2019

आचारसंहितेमुळे तलाठी भरती रखडण्याची चिन्हे


जत,(प्रतिनिधी)-
 विधानसभेची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने राज्यातील तलाठी भरतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुणवत्ता यादी 7 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे, मात्र पुढची प्रक्रिया थांबली असल्याने नियुक्ती मिळणार की नाही, याची चिंता उमेदवारांना लागली आहे.

महापरीक्षा पोर्टलद्वारा 1 हजार 776 तलाठ्यांच्या रिक्त जागांसाठी राज्यभरात 2 ते 26 जुलै या कालावधीत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेची उत्तरतालिका ऑगस्ट महिन्यात दोन वेळा प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारांनी उत्तरतालिकेवर हरकती नोंदवल्याने ही भरती पुन्हा चर्चेचा विषय ठरली. शेवटी ही 7 सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. याही गुणवत्ता यादीवर उमेदवारांनी हरकत घेतली. यादी सदोष असल्याचा त्यांनी दावा केला.शिवाय यादी जाहीर होऊन दहा दिवस उलटले तरी अद्याप पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ही तलाठी भरती प्रक्रिया आचारसंहितेत अडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत. साहजिकच उमेदवारांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, भरतीच्या सुरुवातीच्या काळापासूनच गोंधळ निर्माण झाला. परीक्षेच्या दरम्यान विविध केंद्रांवर आलेल्या अडचणी, आधारकार्ड तपासणी, युट्यूबवर व्हायरल झालेले प्रश्, समान काठिण्य पातळी ते थेट गुणवत्ता यादीपर्यंत या भरतीचा घोळ येऊन ठेपला आहे. यात पारदर्शकपणा नसल्याचा दावा उमेवार सातत्याने करत आहेत. आता जर आचारसंहिता जाहीर झाली तर या संदर्भात आणखी दोन महिने याबाबत काहीच कार्यवाही करता येणार नसल्याने उमेदवारांमध्ये चिंता वाढली आहे.




No comments:

Post a Comment