जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात जोकमाराचे घरोघरी पूजन व औक्षण केले जात असून, मनोभावे दर्शन घेतले जात आहे. जोकमारला पर्जन्यदेवता म्हणूनही ओळखले जाते. गेल्या दोनशे ते तीनशे वर्षापासून जोकमारची पूजा करण्याची प्रथा आहे. जत तालुक्याला दुष्काळ पाचवीला पुजला असल्या कारणाने जोकमार पूजनाची प्रथा कायम राहिली आहे.
जोकमार बळीराजाचे संकट, अडचणी, व्यथा शंकर- पार्वती यांना पोहोचवणारा दूत, म्हणून बळीराजाचे खरे दैवत मानले जाते. जोकमार हा शेतातल्या काळ्या मातीपासून बनवला जातो. तालुक्यात जत शहरासह उमदी, दरीबडची, संख सिध्दनाथ, कागनरी, तिकोंडी, आसंगी तुर्क आदी परिसरात जोकमारची पूजा केली जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माती आणि माणूस यांच्याशी जुळलेल्या श्रद्धेची आपुलकी दाखविणाऱ्या या जोकमाराची अर्थात कार्तिकेयाची भाद्रपदात जन्म श्रद्धेनुसार जोकमाराचा जन्म भाद्रपदात कुंभाराच्या घरी होतो. त्यानंतर पौर्णिमेला मृत्यू होतो. सात दिवसांचे त्याचे आयुष्य असून, कुंभाराच्या घरात जन्म झाला असला तरी, तो वाढतो कोळ्यांच्या घरात. कोळी समाजाच्या महिला जोकमाराला शेणाने सारवलेल्या टोपलीत बसवून ती डोक्यावर घेऊन घरोघरी फिरतात. पौर्णिमेच्या दिवशी भीमनगर वस्तीमध्ये त्याचे डोके मुसळाने फोडले जाते. सात दिवसांनंतर त्याचा मृत्यू होतो.
ही प्रथा अनेक गावात सुरू आहे. पानात ज्वारीत बसवले जाते. त्याला गहू, ज्वारी, बाजरी, भात, अंबील याचा नैवेद्य म्हणून मान आहे. तो बळीराजाचा पाहुणा आहे. पावसाने ओढ दिल्यास, जोकमाराचे पौर्णिमेनंतर आगमन झाल्यानंतर नक्की पाऊस येतो, अशी श्रद्धा आहे.
No comments:
Post a Comment