Wednesday, September 25, 2019

शिक्षकांना इतर कामाला लावल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

जिल्हा परिषदांना ग्रामविकासाचे पत्र
जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषदेतील शिक्षकांस विद्यार्थ्यांना ज्ञानदान
करण्याच्या कामासाठी नियुक्त केले आहे. विद्यार्थ्यांना
शिकविण्याच्या कामाव्यतिरिक्त  अन्य कामांसाठी जुंपल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागानेएका पत्रान्वये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा परिषद व गटविकास अधिकाऱ्यांरीस्तरावर जि.प. शिक्षक यांना विशिष्ठ कामगिरीवर नेमून जिल्हा परिषद मुख्यालयात तसेच गटविकास अधिकारी कार्यालयात अनाधिकृतपणे नियुक्त केल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.

वास्तविक पाहता, जिल्हा परिषद शिक्षकांची पुरेशी संख्या नाही. विद्यार्थ्यांच्या संख्येनिहाय (संचमान्यता) त्या- त्या शाळेसाठी शिक्षक दिलेला असतो. मात्र जिल्हा परिषदेत शिक्षकांची थोड्याफार प्रमाणात का होईना शिक्षकांची कमतरता आहे. असे असतानाही जिल्हा परिषद वा गटविकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या शिकविण्याच्या कामा व्यतिरिक्त अन्य कामे सुपूर्द करणे ही गंभीर बाब असल्याचे शासनाचे मत झाले आहे.
सर्वशिक्षा अभियानातंर्गत व शासनाने दिलेल्या
प्रतिनियुक्तीच्या आदेशा व्यतिरिक्त अन्य ठिकाणी अशा
पध्दतीने शिक्षक कामगिरीवर ठेवणे उचित नाही. संबंधित अधिकाऱ्यांच्या अशा कृतीमुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्यामुळे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी हे या कृतीस जबाबदार ठरतात, असे शासनाच्या ग्रामविकास विभागाने म्हटले आहे.
दरम्यान जिल्हा परिषदांमध्ये व गटविकास अधिकारी
कार्यालयात जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामासाठी
नेमत असल्यास त्यांना तात्काळ त्यांच्या शाळेत परत पाठविण्यात यावे. या निर्देशाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रि.शं.कांबळे यांनी जि. प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.


No comments:

Post a Comment