Thursday, September 26, 2019

जतेत मोकाट जनावरांचा 'रास्ता रोको'

(जत-अथणी रस्त्यावर बैठक मारून बसलेली जनावरे. शहारातल्या प्रमुख रस्त्यावर जनावरांचा नेहमीच रास्तारोको होत असल्याने वाहन चालकांना मार्ग काढणे अवघड होऊन जाते.)
जत,(प्रतिनिधी)-
शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट जनावरांचा रात्रंदिवस वावर वाढला आहे. यामुळे वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. शहरातल्या प्रमुख रस्त्यावरच ही जनावरे 'रास्ता रोको' करत असल्याने वाहन चालक पुरते वैतागले आहेत.

जत शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून याचा त्रास भाजीपाला,फळ विक्रेत्यांसह वाहन चालकांना होत आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ही जनावरे बिनधास्त शिरकाव करत असून मांडलेल्या भाजीपाल्यात बिनदिक्कत तोंड घालतात. ही जनावरे इतकी निर्ढावलेली आहेत की, त्यांना काठीने मारले तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. या जनावरांमुळे विक्रेत्यांचे मात्र नुकसान होत आहे.
जत शहरात शंभराहून अधिक मोकाट जनावरे आहेत. ही जनावरे रात्री आणि दिवसा तहसील कार्यालय, सांगली रोड, विजापूर रोड, अथणी रोड, निगडी, शेगाव रोडवर बैठक मारून बसलेली असतात. त्यांना हाकलले तरी ते पुन्हा परत येऊन बसतात. त्यामुळे  पादचाऱ्यांसह वाहनचालकांना त्रास तर होतोच पण वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. या जनावरांमुळे शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. त्यातच या रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर कमालीचा वाढला असून त्याचा अनेकदा वाहतुकीवर परिणाम होत आहे. रस्त्यांवर मोकाट जनावरे असल्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना मार्ग काढणेही कठीण होत आहे. या जनावरांमुळे अनेकदा वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment