Thursday, September 5, 2019

घरोघरी एलपीजी गॅस पोहचल्याने गोबरगॅसला सोडचिठ्ठी

जत,(प्रतिनिधी)-
एलपीजी गॅस आता ग्रामीण भागातही पोहचला आहे.शासनही यासाठी अनुदान देत आहे.साहजिकच काही शेतकऱ्यांनी गोबरगॅस यंत्रणा बंद करून टाकली आहे.त्यामुळे  आता त्याचे परसदारी फक्त सांगाडेच दिसत आहे. 
गावागावातआणि घराघरात असलेली चूल एलपीजी गॅसच्या आगमनामुळे हद्दपार झाली आहे. झटपट स्वयंपाक होत असल्याने त्यालाच पसंदी दिली जात आहे. त्यातच ग्रामीण भागात बदलती जीवनशैली आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे  पशुधन कमी झाले आहे. शेती व्यवसायामध्ये आधुनिकता आल्याने बैलांच्या मशागतीऐवजी यांत्रिक शेती होऊ लागली आहे. तसेच एलपीजी गॅस आल्याने गायी, म्हैशींच्या शेणावर चालणारे बायोगॅस सयंत्र वापराबाबत तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ही संयंत्रे काळाच्या ओघात कालबाह्य ठरू लागली आहेत. 
वास्तविक काळाच्या ओघात सर्वच क्षेत्रात बदलाव आला आहे. अनेक पारंपरिक बाबी काळाच्या ओघात हरवून गेल्या आहेत. त्यामध्ये गोबरगॅसचाही नंबर लागतो. एकेकाळी प्रतिष्ठेचे ठरलेले पर्यावरणपूरक बायोगॅस संयंत्र म्हणजेच गोबरगॅसला आता कोणी विचारतही नाही. एलपीजी गॅस आता घरोघरी पोहचल्यामुळे गोबरगॅसचे मागच्या दारी सांगाडेच दिसत आहेत.सातत्याने होणारी इंधनाची दरवाढ, वीजेचे भारनियमन याच्या कटकटीवर मात करण्यासाठी  पर्यावरपूरक बायोगॅस संयंत्र म्हणजेच गोबरगॅसची निर्मिती झाली. पूर्वी हा गोबरगॅस म्हणजे प्रतिष्ठेचा अन् श्रीमंतीचा विषय समजला जाई. ग्रामीण भागात शेतीला पूरक पशुपालन केले जाते.  यामधून  दुग्ध व्यवसायालाही चालना मिळत असते. यासाठी  गाय, म्हैस  शेतीच्या मशागतीसाठी पाळल्या जातात. या जनावरांपासून मिळणार्‍या शेणापासून बायोगॅस प्रकल्प चालविला जाऊ शकतो. 
1982 सालापासून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे पंचायत समिती स्तरावरून कृषी विभागामार्फत राष्ट्रीय बायोगॅस  संयंत्र योजना राबवण्यात आली आहे. या योजनेव्दारे एक घनमीटर बायोगॅस संयंत्रास अनुसूचित जाती जमातीच्या शेतकर्‍यांना 7000 रु. प्रती युनिट अनुदान दिले जाते तर सर्वसाधारण लाभार्थ्यास प्रती युनिट 5500 रु. अनुदान दिले जाते. 2 ते 6 घनमीटर बायोगॅस संयंत्रासाठी केंद्र शासनाकडून अनुसूचित जाती जमातीमधील लाभार्थ्यांना 11000 रु. आणि सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याला 9000 रु.अनुदान दिले जाते.मात्र अलीकडच्या दोन वर्षात जत तालुक्यात एकाही शेतकऱ्याने मागणी नोंदवली नाही.
सेंद्रिय पदार्थांचे बॅक्टेरियाव्दारे हवा विरहित अवस्थेत विघटन होऊन तयार होणारा ज्वलनशील वायू म्हणजे बायोगॅस. तो हवेत विरून जाण्यापूर्वी पकडण्यासाठी बायोगॅस संयंत्राचा वापर केला जातो.  बायोगॅसमुळे स्वयंपाकासाठी गॅस, प्रकाशासाठी दिवा, शेणाची बचत, सेंद्रिय खताची निर्मिती शौचालय जोडणीमुळे प्रदूषणाला आळा बसतो. संयंत्राव्दारे औषध फवारणी यंत्रे, सिंचनासाठी इंजिन, तीन ते दहा एचपीच्या विद्युत मोटारीदेखील चालवता येत असल्या तरी त्या तुलनेत त्याचा वापर होत नसल्याचे भीषण वास्तव आहे.

No comments:

Post a Comment