माणसाला काहीच जास्त सोसत नाही. गेली दोन वर्षे देशात पाऊसमान कमी झाले. त्यामुळे देशात अनेक जीवन वस्तूंचे उत्पादन कमी झाले. महागाई वाढली. ,मात्र यंदा जरा चांगली परिस्थिती आहे. देशात बऱ्यापैकी पाऊस झाला ,पण अनेकांना पाऊस जास्तीचा वाटू लागला. त्यामुळे हा पाऊस थांबावा म्हणून लोकांनी बेडकांचा घटस्फोट घडवून आणला. ही घटना मध्य प्रदेशातील आहे.
मध्यप्रदेशमध्ये दोन महिन्यांआधी पाऊस पडावा यासाठी बेडूक आणि बेडकीचे लग्न लावण्यात आले होते. त्यानंतर मध्यप्रदेशात एवढा पाऊस झाला की, पूरस्थिती निर्माण झाली. आता या पावसाला थांबविण्यासाठी चक्क या बेडूक आणि बेडकीच्या घटस्फोट करण्यात आला आहे. भोपाळमध्ये ज्यांनी बेडूक-बेडकीचे लग्न लावले होते, त्यांनीच आता त्यांचा घटस्फोट केला आहे. आपल्या देशात काहीही घडू शकते, हे एक उदाहरण म्हणावे लागेल.
ओम शिव शक्ती मंडळाच्या लोकांनी भोपाळमधील इंद्रपूरी येथे या दोघांचा घटस्फोट केला. मंडळाच्या एका सदस्याने सांगितले की, आमची प्रार्थना यशस्वी झाली. लग्न लावल्यानंतरच मध्यप्रदेशमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र आता पाऊस धोकादायक झाला आहे. हा पाऊस थांबवण्यासाठी आम्ही त्यांचा घटस्फोट केला.
बेडकाच्या लग्नाची ही देशातील पहिलीच घटना नाही. अनेक लोकांचा विश्वास आहे की, बेडूक-बेडकीचे लग्न लावल्याने इंद्रदेव खूष होतो आणि पावसाला सुरुवात होते. मात्र लग्नानंतर बेडूक-बेडकीच्या घटस्फोटाची ही पहिलीच घटना असेल. या घटनेमुळे सर्वच जण हैराण झाले आहेत.
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि म्हणूनच इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत आपल्या देशात पावसाचे महत्त्व अपरंपार आहे. याच कारणाने उन्हाळा संपण्याआधीच यंदा पाऊस चांगला येऊ दे, अशी प्रार्थना केली जाते. शेती, पिण्याचे पाणी या दोन्हींसाठी पाऊस अत्यावश्यकच आहे. पण, पावसाळा संपण्याच्या स्थितीत असूनही सातत्याने बरसणारा पाऊस मानवी जीवितासाठीच तर शेतीसाठीही घातकच असतो. दुर्दैवाने हीच स्थिती देशात सध्या अनुभवाला येत आहे. नको नको म्हणण्याइतका पाऊस कोसळतो आहे. अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे आणि आता मुख्य म्हणजे शेतीलाही पावसाची गरज नाहीय. पावसाची उसंत आणि ऋतूचक्राप्रमाणे पितृपक्षातील कडक उन्हामुळे पिकांना जीवदान देणार आहे. त्यामुळे पावसाला आता 'थांब रे बाबा' अशी विनंती करण्यासाठीच मध्यप्रदेशातील बेडकांचा घटस्फोट घडवून आणण्याचा प्रकार पाहण्यात आला.
No comments:
Post a Comment