Wednesday, October 2, 2019

जत परिसरात आढळली दुर्मिळ कंदीलपुष्प वनस्पती


जत,(प्रतिनिधी)-
राजे रामराव महाविद्यालय, जत च्या परिसरात दुर्मिळ सिरोपेजिया बलबोसा या वनस्पतीची लुशी ही दुर्मिळ प्रजात वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. कु. वसुंधरा खोत यांना आढळली.  याबाबत अधिकची माहिती देताना त्यांनी सांगितले की, आकाश कंदील सारखी या वनस्पतीच्या फुलाची रंगीबेरंगी सुंदर रचना असल्यामुळे याला 'कंदिलपुष्प' म्हणतात. फुलांचा रंग पांढरा, पिवळा, हिरवट असून त्यावर लाल, जांभळ्या ठिपक्यासोबतच रेघांची सुंदर नक्षी असते. जुलै ते सप्टेंबरमध्ये उमलणाऱ्या कंदीलपुष्पाचे तब्बल ६१ प्रकार भारतामध्ये बघायला मिळतात.
महाराष्ट्रात २५ तर सांगली जिल्ह्यात पाच प्रकारची कंदीलपुष्पे बघायला मिळतात. डोंगर कडे-कपारीत काही वेळा ही फुले वेली अथवा झुडपामध्येही आढळून येतात. परंतु गेल्या काही वर्षात कमी होणारे पर्जन्यमान, रासायनिक शेतीमुळे परागीकरण करणा-या मधमाशा व कीटकांची कमी होणारी संख्या, तसेच या वनस्पतीची कंदमुळे गुराख्यांनी खाण्यामुळे या वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
यंदा पाऊस चांगलाच बरसल्याने अनेक रंगीबेरंगी विविध आकाराची रानफुले डोंगरमाथ्यावर, कडे-कपारीत आपल्याला दिसतात. परंतु या फुलझाडांची माहिती व परिस्थिकीमधील त्यांचे महत्त्व माहिती नसल्यामुळे आपण पायदळी तुडवून त्यांचे नुकसान करतो. निसर्गात आढळणा-या प्रत्येक वनस्पती व त्यांच्या फुलाला वेगळेपण दिलेले आहे. परागीभवन होण्यासाठी उपयुक्त  कीटकांना आकर्षित करण्यासाठी काही फुलांना आकर्षक रंग, तर काही फुलातील मकरंदाला गोड स्वाद दिला आहे. या सर्वांला भुलून कीटक फुलांच्या आसपास घोंगावत असतात. कंदिलपुष्पाच्या रंगाला व मधाला भुलून अनेक कीटक आकर्षित होतात. फुलातील मधाच्या लालसेने व दर्पामुळे तसेच फुलांच्या पाकळ्यावर बाहेरच्या बाजूला नळीवर उतरण्याची जागा आणि पुढे कुठे जायचे ते दाखवणारे ठिपके याचा आधार घेत हे कीटक खाली जातात खरे परंतु, बाहेर येण्यासाठी वर येताना तंतू उलट्या दिशेने असल्यामुळे परागकणाजवळ गेलेल्या कीटकाला पुन्हा बाहेर पडता येत नाही. ज्यावेळी हे फूल कोमेजून मलूल होते त्यावेळीच हे कीटक बाहेर पडतात.
कंदिलपुष्पाच्या विविध प्रजाती पश्चिम घाटातील ठाणे, रायगड, माथेरान, खंडाळा, माळशेज, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर, चांदोली, राधानगरी परिसरात पाहायला मिळत असल्याची माहिती अभ्यासक प्रा. कु. खोत यांनी दिली. परंतु जत सारख्या दुष्काळी भागात हि वनस्पती सापडल्याने तिचे महत्त्व जास्त  अधोरेखित होते. राजे रामराव महाविद्यालयाचा परिसर हा संरक्षक भिंत बांधून संरक्षित केल्यामुळे जवळपास ३५० विविध संरक्षित वनस्पतींची नोंद करण्यात आल्याची माहिती वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. राजेंद्र लवटे यांनी दिली. वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण यासाठी प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

No comments:

Post a Comment