Tuesday, September 24, 2019

महादेव विद्यालयात "ग्रंथ समर्पण महोत्सव" उत्साहात साजरा

( रावळगुंडवाडी ता.जत येथील महादेव विद्यालयात ग्रंथ समर्पण सोहळा पार पडला. यावेळी प्रारंभी विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथदिंडी काढली.)
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील राळगुंडवाडी येथील श्री महादेव विद्यालय येथे 'ग्रंथ समर्पण महोत्सव' सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या ग्रंथालयाला सुमारे दीड लाखांची पुस्तके देणगीच्या स्वरूपात मिळाली. या निमित्ताने हा सोहळा साजरा करण्यात आला.

जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेणावर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख वक्ते  शिवाजीराव अडसूळ (तासगाव), नंदकुमार गुरव, प्रा. महादेव जाधव, कवी किशोर वाघमारे  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सकाळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.
 अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ. बन्नेणावर  यांनी 'विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करावी, मोबाईल सारख्या क्षणभंगुर गोष्टींपासून दूर राहावे, पालकांनी मुलांना ग्रंथ वाचण्यासाठी प्रवृत्त करावे', असे आवाहन केले.  श्री.अडसूळ यांनी ग्रंथ हेच का गुरू?  हे पटवून देऊन, आई-गुरू-ग्रंथ यांचे महत्व अधोरेखित केले. अलिकडे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होताना पहायला मिळत आहे, परंतु इथे उलट परिस्थिती पहायला मिळते. नैतिक मुल्ले रुजविण्याचे काम  येथील शिक्षक प्रामाणिकपणे करत असल्याच्या भावना देणगीदारांनी व्यक्त केल्या. जवळपास ३२ देणगीदारांनी दीड लाख रुपयांची मदत ग्रंथालयाला केली. यावेळी सर्व देणगीदारांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. यासाठी पुढाकार घेऊन मोलाचा वाटा उचलणारे  बी. आय. हिरगोंड यांचा आवर्जून सत्कार करण्यात आला.
    प्रारंभी प्रास्ताविक बी.आय.हिरगोंड, स्वागत पी. एम. हिरगोंड यांनी केले. तर सूत्रसंचालन पी.सी.हिरगोंड यांनी केले शेवटी आभार आर.एम.दळवाई यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, सौ. नीला हत्ती, सरपंच ईरगोंडा लोहगाव, पोलीस पाटील भीमाशंकर हिरगोंड,अंबाजी हिरगोंड,अशोक हिरगोंड, कुमार लांडगे, शिद्धाप्पा कुंभार, संस्थेचे उपाध्यक्ष  डी. आर. गडीकर, सचिव ए. पी. हिरगोंड, एम. ए. गडीकर, मुख्याध्यापक एस. एन. गडीकर, मराठी-कन्नड माध्यमाचे सहशिक्षक, विद्यार्थी, पालक  आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment