Friday, September 13, 2019

कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीमध्ये कृषी कक्ष


जत,(प्रतिनिधी)-
राज्यातल्या कृषी सहायकांना गावपातळीवर बसण्या-उठण्यासाठी जागा नव्हती,पण आता त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये खास कृषी कक्ष उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्य शासनाने तसा आदेश दिला असून तब्बल साडे अकरा हजार कृषी सहायकांना याचा लाभ मिळणार आहे.

कृषी सहायकांना गावपातळीवर हक्काची जागा नव्हती. त्यामुळे त्यांना शेतकर्यांच्या बांधावर राहूनच मार्गदर्शन किंवा शासकीय योजनांची जागृती करावी लागत होती. मात्र कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कामकाजाची सूत्रे हाती घेतल्यावर कृषी सहायकांची सोय पाहिली. ग्रामपंचायतीमध्ये या सहायकांना खूर्ची,टेबल, कपाट आणि स्वतंत्र कक्ष मिळावा, अशी मागणी होती. आता त्यांना हक्काची जागा मिळाली असून या कक्षात फलक लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. या कक्षात कृषी कर्मचार्याचे नाव, मोबाईल नंबर, कामाचे दिवस आणि वेळ नमूद केली जाणार आहे.यामुळे शेतकर्यांची गैरसोय होणार नाही. कृषी कर्मचार्यांसाठी ही दिवाळी भेट असल्याचे म्हटले जात आहे.
गावपातळीवर कृषी सहायकांना फर्निचरची व्यवस्था कृषी आयुक्तांनी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय कृषी सहायकाचे वेळापत्रक तयार करून ग्रामपंचायतीमध्ये लावावे. हेच वेळापत्रक जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरदेखील टाकावे, असेही आदेशात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment