पावसाळा संपत आला तरी पाण्याचे संकट कायम
जत,(प्रतिनिधी)-
पावसाळा संपत आला तरी जत तालुक्यातला पिण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम आहे. त्यातच सरकारी बाबू जबरदस्तीने पाण्याचा टँकर बंद करण्याची कारवाई करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षभरापासून जत तालुक्यात पाण्याचे संकट उभे आहे.
गेल्या महिन्यापर्यंत जत तालुक्यात 109 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. आजही पाण्याची परिस्थिती कायम असतानाही सरकारी अधिकारी टँकर बंद करण्यासाठी जबरदस्तीने लिहून घेत आहेत आणि टँकर बंद केला जात आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महापूर काळात सरकारी बाबूंनी जी तत्परता दाखवली ती दुष्काळी भागातील समस्या सोडवण्यासाठी का दाखवली जात नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
परवा झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत यावरून सदस्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. दुष्काळी भागातील जि. प.सदस्य याबाबत आक्रमक झालेले होते. या सभेत जत तालुक्यातील 75 गावांच्या पाणी योजनेचा विषय चांगलाच पेटला. या 75 गावांना एकाच तलावातून पाणी देण्याचा प्रस्ताव होता. तो काळ वेगळा होता. आता मात्र स्थिती वेगळी आहे. सिंचन योजनांतून पाणी आले आहे. स्थानिक तलाव भरले जात आहेत. अशा वेळी स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना मान्यता देण्याची गरज आहे.परंतु, तसा प्रस्ताव तात्काळ मान्य करायचे सोडून कागदी घोडे का नाचवलेजात आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
जत तालुक्यात अजूनही चारा छावण्या सुरू आहेत. त्यांची बिले देण्यात आली नाहीत. काही छावण्या जबरदस्तीने बंद करण्यात आल्या आहेत. काही छावण्यांमध्ये सोयी सुविधा आणि चारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जनावरे घरी नेणे पसंद केले. सप्टेंबर अखेर छावण्या सुरू ठेवण्याचे आदेश आलेले असले तरी जत तालुक्यात अजूनही मोठा पाऊस झाला नाही. पिकांची अवस्था वाईट आहे. गेल्या दोन वर्षांपासून जत तालुक्यात पाऊस नसल्याने शेतकरी आर्थिक तंगीत आहे. बाजारात उठाव नाही. पीक विम्याचा म्हणावा तसा लाभ नाही. त्यामुळे तालुक्यातील जनता मरणयातना सोसत असताना सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. जत तालुक्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment