Saturday, September 14, 2019

मारुती सुझुकी कंपनीला ग्राहक मंचचा दणका

नवी कोरी कार बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे पेटली होती. विमा कंपनीकडून काही रक्कम मिळाली होती, मात्र याहीपेक्षा अधिक खर्च ग्राहकांचा झाला होता. त्यामुळे ग्राहकाने ग्राहक मंचाकडे ही तक्रार दाखल केली  होती. त्यानुसार ग्राहकाला न्याय मिळवून दिला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील आहे.
कपिल नगर येथील सिद्धार्थ ढोके यांनी घेतलेली नवी मारुती डिझायर ही कार बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे जळाली. यासंदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच भंडारा यांनी नुकताच निकाल दिला. यात कार निर्माता कंपनी मारोती सुझुकीला दोषपूर्ण कार पुरविल्याबद्दल १ लाख ४७ हजार तसेच भंडारा येथील ऑटोमोटीव्ह डिलरला दोषपूर्ण सेवेसाठी ४0 हजारांचा दंड ठोठावला आहे.

भंडारा शहरातील कपिल नगरातील सिद्धार्थ ढोके यांनी ३१ ऑगस्ट २0१३ मध्ये मारोती सुझुकीच्या ऑटोमोटीव्ह शोरुममधून मारोती डियाझर व्हीएक्सआय ही कार ६ लाख ३२ हजार ८५३ रुपयाला कर्ज घेऊन विकत घेतली. मात्र दोन महिन्यानंतर ही कार घरासमोरील पोर्चमध्ये असताना ८ नोव्हेंबर रोजी कारला अचानक आग लागली. यात संपूर्ण कार जळाली. तसेच बाजुला असलेली बजाज प्लेझर ही गाडीसुद्धा जळाली. त्यानंतर ढोके यांनी भंडारा पोलिस व डिलरला तक्रार केली. त्यानंतर उलट डिलरने वाहन निरीक्षण, तपासणी शुल्क अडीच हजार रुपये घेतले. त्यानंतर सदर कार नागपूर येथे सव्र्हीस सेंटरला नेण्यासाठी ५ हजार ५00 रुपयांचा खर्च स्वत: करावा लागला.
वकिलामार्फत नोटीस पाठवून नवीन कार देण्याची मागणी केली. परंतु, डिलरने नोटीसचे उत्तर दिले नाही. शेवटी ढोके यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे नुकसान भरपाईसाठी तक्र ार नोंदविली.
याप्रकरणी कारचा विमा असल्याने विमा कंपनीकडून ५ लाख २२ हजार ८९९ रुपये मिळाले होते. मात्र मुळात कार रस्त्यावर चालण्याकरीता ६ लाख ३३ हजार ७५३ रुपये इतका खर्च आला होता. तसेच अन्य खर्च देखील झाला होता.
याप्रकरणी सिद्धार्थ ढोके यांची बाजू अँड. संजीव गजभिये यांनी पुराव्यासह जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण न्यायमंचाकडे मांडली. साक्षपुराव्यानंतर ग्राहक मंचचे अध्यक्ष भास्कर योगी यांनी निकाल दिला. यात कार निर्माता मारुती सुझुकी ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमि.
गुरगाव हरियाना यांना दोषपूर्ण कारच्या मोबदल्यात त्यांनी तक्र ारकर्त्याला नुकसान भरपाई दाखल १ लाख ४७ हजार ६५ रुपये २0१४ पासून ९ टक्के व्याजासह द्यावे, ऑटोमोटीव्ह मन्युफॅक्टर प्रा. लि. भंडारा तसेच कार निर्माता कंपनी यांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदात्याला मानसिक व शारिरीक त्रासापोटी ३0 हजार रुपये आणि तक्र ार व नोटीस खर्च १0 हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला.

No comments:

Post a Comment