Saturday, September 7, 2019

शाळांमध्ये संगणक साक्षरतेचे 'तीनतेरा

जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय अनुदानित, खासगी मान्यता प्राप्त विद्यालयात संगणक प्रयोग शाळा स्थापन करण्याचा शासकीय आदेश आहे. परंतु, अद्यापही जत तालुक्यातील ग्रामीण भागातील कित्येक शाळा संगणकापासून वंचित आहेत. तर काही संगणकावर धूळ बसली असून, विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञानचे दिले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना संगणक हाताळावे, याकरिता विद्यालयात संगणक आहेत. ते संगणक बंद असून, विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित आहेत. संगणक आत शेवटच्या घटका मोजत असून धूळखात असल्याचे दिसून येत आहेत.

ग्रामीण भागातील शाळांची अवस्था अत्यंत बिकट होत आहे. जिथे शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्याप्त जागा मिळत नाही तिथे संगणक प्रयोगशाळेसाठी १८ बाय २0 आकाराची खोली तयार कशी तयार करावी, याबाबत मुख्याध्यापक., संस्थाचालक चिंतित आहेत. याशिवाय संगणक प्रयोग शाळेसाठी १५ ते २0 संगणक कसे उपलब्ध करावे त्याची आर्थिक तरतूद कशी करावी, याबद्दल शासनाचे स्पष्ट धोरण नसल्याचे जाणवते. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने २१ मे १९९९ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आदेशान्वये संगणक प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या आदेशान्वये ६ ते १0 चे किमान १५ वर्ग असलेल्या शाळेत संगणक असणे आवश्यक होते. हे संगणक शासनाने निर्धारित केलेल्या तपासणीप्रमाणे असावेत, याची खात्री शालेय व्यवस्थापनाने करण्याचे निर्देश दिले आहे.
शाळेच्या व्यवस्थापकाने स्वत:च्या निधीतून खासगी सस्थांच्या सहकार्याने संगणक प्रयोग शाळेची स्थापना करावी तसेच व्यवस्थापकांनी स्थानिक स्वराज्य संस्था व व्यापारी संस्था याशिवाय आमदार व खासदार निधीतून प्रयोग शाळा स्थापन करायच्या असल्याने बहुतांशी आमदार व खासदारांनी आपल्या मर्जीतील शाळांना संगणक उपलब्ध करुण दिले. परिणामी, त्यांच्या आशीर्वाद नसणार्‍या हजारो शाळा संगणक प्रयोग शाळेपासून वंचित आहेत. परंतु, संगणक असणार्‍या शाळामधील शिक्षकही विद्यार्थ्यांना संगणकांचे ज्ञान देण्यास असमर्थ असल्याने संगणक शाळेत असूनही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही.
संगणक प्रयोग शाळा स्थापन करण्यासाठी जिल्ह्याधिकार्‍यांकडे अर्ज करून निधि मिळविलेल्या प्रयोगशाळेवरील आवर्ती व अनावर्ती खर्च, शिक्षकांचे परीक्षण खर्च व खोलीची पूर्व तयारी आदी बाबींवरील खर्च मागविन्याची सूचना करण्यात आली. ज्या अनुदानित खासगी माध्यमिक शाळांच्या विकासनिधीमध्ये रक्कम शिल्लक असेल अशा शाळांनी शिक्षणाधिकाऱयांची परवानगी घेऊन संगणक प्रयोग शाळेची स्थापना करावयाची आहे.
परंतु, बहुतेक शाळेचा निधी राहत नसल्याने संगणक प्रयोग शाळा स्थापन करताना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे तालुक्यातील अनेक शाळा संगणकापासून वंचित राहिल्या आहेत. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
तालुक्यात अनेक शाळेत व विद्यालयात संगणक कक्ष हे धूळ खात असल्याने याकडे कुणी लक्ष्य देत नाहीत, अशा या संगणक ज्ञानामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तर काही जिल्हा परिषदच्या शाळेतसुद्धा हीच अवस्था असल्याने शिक्षणाचा सावळा गोंधळ समोर येत आहेत, हे वास्तव तालुक्यातून दिसून येत आहे. याकडे शासनाने लक्ष देवून प्रत्येक शाळेत विद्यालयात संगणक व एक शिक्षक उपलब्ध करुण द्यावे, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment