जत शहरापासून दक्षिणेला सुमारे दोन अडीच किलोमीटर अंतरावर, अथणी मार्गालगत असलेल्या डोंगरावर श्री अंबाबाईचं वसतीस्थान आहे. अलिकडच्या काही वर्षात याठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जात असल्याने आणि हा डोंगर परिसर शासनाने पर्यटनस्थळ म्हणून विकसित करायला घेतल्याने नवरात्र काळात आणि देवीच्या वारादिवशी भाविक या ठिकाणी गर्दी करताना दिसतात. निसर्गरम्य परिसर असल्याने अनेक भाविक सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह वेळ घालवायला येतात. परिसरातल्या शाळांच्या वनभोजनाच्या सहली येत असतात. या ठिकाणी एकप्रकारची शिस्त लावली गेली असल्याने भाविकांना इथे यायला आवडते. साहजिकच एक पर्यटनस्थळ म्हणून हा अंबाबाई डोंगराचा परिसर हळूहळू नावारुपास येऊ लागला आहे.
विशेष म्हणजे मंदिर स्थापनेचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. या ठिकाणी जी अंबाबाईची मूर्ती आहे ती जत संस्थानचे डफळे घराणे आहे,त्यांनी प्रतिष्ठापना केली आहे. सुरुवातीला या डोंगरावर एक छोटेसे मंदिर होते. भाविक नवरात्र उत्सव काळात या ठिकाणी यायला सुरुवात केल्यानंतर काही लोकांना हा परिसर विकसित करावा, असे वाटल्याने त्यांच्या माध्यमातून श्री अंबिका नवरात्र उत्सवाची स्थापना झाली. भाविकांच्याकडून वर्गणी आणि दानशूर व्यक्तींकडून आलेल्या देणगीतून आताचे भव्य मंदिर आणि सभामंडप साकाराला आले. मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला.अंबिका मंडळाने नवरात्र उत्सव सुरू केला. भाविक या काळात पहाटे पायी चालत डोंगराकडे येत. मंदिराचा विकास होत असतानाच भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जत एसटी आगाराकडून या काळात सकाळ-संध्याकाळ एसटी बसची सोय करण्यात येऊ लागली. आता भाविकांच्या गर्दीनुसार जादा गाड्याही सोडल्या जातात. याशिवाय भाविक चालत, स्वत:च्या वाहनांनी येतात. सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीला भाविकांची मोठी गर्दी असते. या काळात काही भाविक उपस्थितांना प्रसाद रुपाने केळी, खिचडी, पेढे आदींचे वाटप करतात. कोजागिरी पोर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते.यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
नवरात्रीच्या प्रारंभी अश्विन प्रतिपदेला अभिषेक घालून घटस्थापना केली जाते. काही भाविक नऊ दिवस डोंगरावर मुक्काम करून उत्सव साजरा करतात. या दिवसांमध्ये होणारी आतीषबाजी, श्री अंबाबाई पूजा,घागरी फुंकणे त्याचबरोबर दिवटी तेवत ठेवणे, गोंधळ- जागरण कार्यक्रम होत असतो. भाविकांची यावेळी मोठी गर्दी असते. विजयादशमी म्हणजे दसर्यादिवशी देवीची सालंकृत पूजा- अर्चा हाऊन आणि अभिषेक घातल्यानंतर देवीचा दरवाजा बंद होतो. आणि हा दरवाजा कोजागिरी पोर्णिमेला उघडला जातो. यादिवशी मोठी यात्रा भरते. देवी सहस्त्र नामावली, अभिषेक आणि महाप्रसाद असतो. सध्या हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असल्याने या परिसराचे महत्त्व वाढत आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
No comments:
Post a Comment