जत,(प्रतिनिधी)-
गणेशोत्सव झाल्यानंतर कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते, याची जाणीव ठेवत
अनेक राजकीय पक्षपुरस्कृत संघटनांनी यंदा शिक्षकदिनाचे औचित्य साधून गुरुजनांवर पुरस्कारांची बरसात करायला सुरू केली आहे. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना मोठया प्रमाणात टार्गेट केले आहे. त्याच बरोबर बड्या शिक्षण संस्थांनीच संस्थेतील अनेक शिक्षकांची पुरस्कारांसाठी शिफारस करून ठेवत विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी पदरचा एक अन् एक कार्यकर्ता महत्त्वाचा असल्याचा संदेश दिला आहे.
विधानसभेला इच्छूक असलेल्या रवींद्र आरळी, उद्योगपती सी. आर. सांगलीकर, प्रकाश जमदाडे, प्रभाकर जाधव यांच्यासह माध्यमिक शाळांनिगडीत असलेल्या सामाजिक संस्थाचे पुरस्कार शिक्षकांना दिले जात आहेत.
एरवी बाराही महिने अनुदानापासून तर भरतीपर्यंतचे अनेक प्रश्न घेऊन झगडणाऱ्या शिक्षकांकडे लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाचेही दुर्लक्षच होते. पण, शिक्षकदिनी काही संस्था शिक्षकांच्या कार्याची यथोचित दखल घेऊन त्यांचा शक्य तितका सन्मानही करतात.
मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत शिक्षक पुरस्कारार्थीची संख्या
वाढली आहे. शिक्षकांच्या संख्येप्रमाणेच त्यांना पुरस्कार
देणाऱ्या संघटना अन् संस्थांची संख्याही वाढली आहे. निवडणूक आयोग शिक्षकांना थेट निवडणुकीच्या
प्रचारकार्यात सहभागी होण्याची परवानगी देत नसला, तरीही राजकीय प्रभाव असणाऱ्या शिक्षण संस्था येनकेनमार्गे निवडणुकीशी संबंधित विविध कामांसाठी शिक्षकांचा उपयोग करून घेत असल्याचा प्रकार गत लोकसभा निवडणुकीत पुनःप्रत्ययास आला.
शिक्षकांच्या गटांची बांधणी जिल्ह्याच्या रचनेत काही बड्या शिक्षण संस्थांचा समावेश होतो. निवडणूक काळामध्ये या संस्थांची राजकीय भूमिकाही स्थानिक
राजकारणात महत्त्वाची ठरत असल्याने विविध राजकीय पक्ष आणि बडे नेतेही या संस्थांची मनधरणी करण्यात स्वारस्य मानतात. काही संस्थांचे कर्तेधर्ते या निवडणुकांमध्ये थेट उतरत असल्याने मागाहून येणाऱ्या संस्था परिवाराच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागते. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिक्षकांच्या गटांची बांधणी करण्यास अनेक संस्थांमध्ये वेग आला आहे. अशावेळी शिक्षकांमधील संघटनात्मक कार्यातील काही चेहरे हुडकून त्यांना पुरस्कार आदी गौरवाच्या माध्यमातून खूश ठेवण्यावर यंदाच्या शिक्षकदिनाचे औचित्य साधून भर दिला गेल्याचे चित्र आहे.
No comments:
Post a Comment