Wednesday, September 11, 2019

जत तालुक्यात शिक्षणाचा खेळखंडोबा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. शिक्षकांना शिक्षा म्हणून जत तालुक्यात बदली दिली जाते आणि भोग मात्र विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतात, हे दाहक वास्तव आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत या विषयावर वर्षानुवर्षे चर्चा होतेय, फरक शून्य पडला आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा आणि प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षक यामुळे खेळखंडोबा मांडला गेला आहे. या परिस्थितीचा उद्रेक आता होऊ लागला आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जत तालुक्यातील प्रश्नांवर रान उठवले गेले. सदस्य विक्रम सावंत, सरदार पाटील, महादेव दुधाळ आदींनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यात शिक्षणाचा विषय ऐरणीवर आहे.

शिक्षण सभापती तम्मनगौडा रविपाटील हे जत तालुक्यातील आहेत. त्यामुळे त्यात राजकारण आहे, असा युक्तीवाद होईल, मात्र ते अर्धसत्य आहे. येथील शिक्षण व्यवस्थेला वाळवी लागल्याचे आकडेच सांगतात. तालुक्यात मराठी शाळा २९७ असून शिक्षक पदे १०३७ आहेत. पैकी तब्बल २६४ जागा रिक्त आहेत. कन्नड शाळा १३२ असून ५८ पदे रिक्त आहेत. उर्दू शाळांत १८ शिक्षक कमी आहेत. केंद्र शाळांना २८ पैकी १४ केंद्रप्रमुख आहेत. १४ जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे, जे काही शिक्षक येथे नियुक्तीवर आहेत,
त्यातील निम्म्याहून अधिकांचा भावना येथे 'काळापाणी'ची शिक्षा झाली आहे, अशीच असल्याचे सांगितले जाते. काही शिक्षकांनी चुका केल्या तर त्यांना शिक्षा म्हणून जतला बदली दिली जाते, इतकी गंभीर परिस्थिती आहे.
गुणवत्तेच्या पातळीवर दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची चमक लक्षवेधी आहे, असे कौतुक जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. आता त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे वाटोळे होणार नाही, अशी व्यवस्था राबवण्याची गरज आहे. प्रतिनियुक्तीचे नाटक कशाला? एका शाळेत बदली झालेल्या शिक्षकाला प्रतिनियुक्तीवर सोयीच्या ठिकाणी नेमणूक देण्याचा नवा पायंडा पडला आहे. जत तालुक्यातील १७ शिक्षक प्रतिनियुक्तीवर आले आहेत. या प्रकरणांत काही देव-घेवही होत असल्याची चर्चा आहे. काही नेत्यांनी जतचे वाटोळे करून आपल्या मतदार संघाची पोळी भाजली आहे. या सर्व नियुक्त्या तातडीने रद्द करण्याची मागणी जतच्या सदस्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment