Thursday, September 19, 2019

'वंचित आघाडी' चा उमेदवार ठरवणार जतचा आमदार ?

जत,(प्रतिनिधी)-
पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या इच्छूकांनी आपली मोट बांधली असून यात भाजप मध्ये इच्छूकांची मोठी गर्दी झाली आहे. काँग्रेसकडून विक्रम सावंत प्रबळ दावेदार असले तरी आघाडीच्या जागा वाटपात  जत मतदार संघ राष्ट्रवादीला  सोडल्याचीही चर्चा असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच वंचित आघाडी आपला उमेदवार देणार असल्याने जतच्या राजकारणात कोणती समीकरणे घडणार ,याबाबत उत्सुकता आहे.
जतचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर  जत विधानसभा मतदारसंघाने १५ आमदार अनुभवले आहेत. शासन नियुक्त आमदार म्हणून जे. के. मोगली हे राहिले तर १४ वेळा जनतेतून आमदार निवडले गेले आहेत. नऊ जणांना आमदार होण्याचा बहुमान मिळाला आहे. जत विधानसभा मतदारसंघावर पूर्वी काँग्रेसची मजबूत पकड होती, पण मागील तीन विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले आहे. सर्वाधिक काळ आमदारपदी राहण्याचा मान उमाजीराव सनमडीकर यांना मिळाला आहे. तर दोनवेळा आमदार होण्याचा मान श्रीमंत विजयसिंहराजे डफळे, एस. टी. बामणे, अॅड. जयंत सोहनी यांना मिळाला.
मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल चारवेळा तालुक्याबाहेरील उमेदवाराच्या गळ्यात जतकरांनी आमदारकीची माळ घातली आहे. बाहेर तालुक्यातून बेवून बॅ.टीके.शेंडगे, अॅड. जयंत सोहनी, सुरेश खाडे व प्रकाश शेडगे हे आमदार झाले. जतच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात डफळे संस्थांचा दबदबा स्वातंत्र्यापूर्वी जसा होता तसाच स्वातंत्र्यानंतरही राहिला आहे. श्रीमंत अनिलराजे डफळे असेपर्यंत राजकीय दबदबा होता. मुंबई प्रांताची विधानसभा अस्तित्वात येण्याआधी जी. के. मोगली हे १९४९ मध्ये शासननियुक्त आमदार होते. जत विधानसभेसाठी १९५२ साली प्रथम
मुंबई प्रांताची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत अपक्ष उभा राहिलेले श्रीमंत विजयसिंहराजे डफळे हे विजयी झाले. जनतेतून पहिले आमदार होण्याचा (सांगली जिल्ह्याचे पहिले खासदार होण्याचा मानही त्यांनाच जनतेने दिला आहे.)  त्यांनीच पटकाविला. १९५७ साली झालेल्या
निवडणकीत श्रीमंत विजयसिंहराजे डफळे हे दुसऱ्यांदा काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले. या निवडणुकीतही ते विजयी झाले. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या मुंबई विधानसभेत श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांनी सलग दहा वर्षे जतकरांचे प्रतिनिधीत्व करत इतिहास घडविला.
१९६२ च्या निवडणुकीत काँग्रेसने धनगर समाजाचे पहिले बॅरिस्टर म्हणून ओळखले जाणारे, फॉरेन रिटर्न टी. के. शेंडगे यांना उतरवले. शेंडगे हे मुळचे तासगाव तालुक्यातील पेड येथील रहिवासी, ते प्रचंड मतांनी निवडून आले. जतच्या इतिहासात प्रथमच तालुक्याबाहेरील व्यक्ती आमदार पदावर विराजमान झाली. १९६७ साली लोकसंख्येच्या आधारावर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. पंचायत समितीत लिपिक म्हणून कार्यरत असलेले एस. टी. बामणे यांना श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांनी लिपिक पदाचा राजीनामा देण्यास सांगून काँग्रेसमधून उमेदवारी दिली. बामणे यांचा या निवडणुकीत एकतर्फी विजय झाला. १९०२ साली एस. टी. बामणे यांना राजेसाहेबांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली.
सलग दोनवेळा आमदार होण्याची संधी श्रीमंत विजयसिंहराजें नंतर बामणे यांना मिळाली. १९७८ साल हे राज्यात राजकीय घडामोडी जत घडविणारे ठरले. काँग्रेसची इंदिरा काँग्रेस व रेड्डी काँग्रेस अशी विभागणी झाली. तत्कालीन आमदार एस. टी. बामणे हे सलग तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावण्यासाठी इंदिरा काँग्रेसकडून उभारले. श्रीमंत विजयसिंहराजे डफळे हे रेडी काँग्रेसमध्ये होते. मूळ आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील अॅड. जयंत सोहनी हे नोकरीच्या निमित्ताने जतमध्ये आले.
त्यांनी नोकरी सोडून जत न्यायालयात वकिली सुरू केली होती. श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांनी रेड्डी काँग्रेसकडून अॅड.सोहनी यांना निवडणूक रिंगणात  उतरवले. अॅड. सोहनी यांनी आमदार बामणे यांना पराभूत करून एकतर्फी विजय संपादन केला. १९८० साली घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर विधानभा झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार  अॅड. सोहनी यांना उमेदवारी देण्यास काँग्रेसचा विरोध होता. पण माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सोहनी यांना उमेदवारी दिली. डफळे यांनी याहीवेळी संपूर्ण तालुका पिंजून काढत सोहनी यांना सलग दुसऱ्यांदा आमदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला.
२५ हजार मतांनी अँड. सोहनी हे विजयी झाले.. १९८५ च्या निवडणुकीत भारतीय सैन्य दलात सुभेदार म्हणून सेवा बजावलेले उमाजीराव सनमडीकर हे आमदार झाले.१९७९ साली राजकारणात आलेले सनमडीकर हे प्रथम पंचायत समितीचे सदस्य झाले, डफळे यांनी त्यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. १९९० साली जत विधानसभेची जागा आरपीआयला सोडण्यात आली विवेक कांबळे यांना आरपीआयने उमेदवारी दिली. आरपीआयला ही जागा सोडल्याचे जत काँग्रेसच्या नेत्यांना रुचले नाही. त्यांनी उमाजीराव सनमडीकर यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले. काँग्रेसचे विवेक कांबळे व शिवसेनेचे अनंत अडसूळ यांना पराभूत करून सनमडीकर हे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. अपक्ष निवडून आलेले सनमडीकर यांनी त्यावेळी शरद पवार यांच्या सरकारला जाहीर पाठिंबा दिला होता.
१९९५ ची निवडणूक ही लक्षवेधी झाली. या निवडणुकीत काँग्रेसने उमाजीराव सनमडीकर यांना उमेदवारी दिली. जतमधील नेत्यांनी सनमडीकर यांच्या नावाला जोरदार विरोध करत श्रीमंत अनिलराजे डफळे,  विद्यमान आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे नेते  सुरेश शिंदे यांनी तालुका विकास आघाडीची स्थापना केली. २९ वर्षीय मधुकर कांबळे यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले.या निवडणुकीत सलग दोनवेळा आमदार झालेले सनमडीकर यांचा पराभव झाला. मधुकर कांबळे यांनी त्यावेळी सत्तेत आलेल्या भाजप-सेनेला पाठिंबा दिला.
१९९९ ची निवडणूक काँग्रेसचे उमाजीराव सनमडीकर विरुद्ध भाजपचे मधुकर कांबळे, राष्ट्रवादीचे सिताराम व्हनखंडे, अपक्ष उमेदवार, विद्यमान सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्यात झाली. या निवडणुकीत मधुकर कांबळे यांचा पराभव झाला व तिसऱ्यांदा उमाजीराव सनमडीकर हे आमदार झाले. या निवडणुकीत सनमडीकर यांनी कांबळे यांचा वचपा काढला. जतच्या राजकारणात नवा इतिहास लिहिला गेला. काँग्रेसने याचवेळी सनमडीकर यांना महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देत राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. जतला हा बहुमान प्रथमच मिळाला.
२००४ च्या निवडणुकीत तालुक्यात सुरेश खाडे यांच्या रूपाने प्रथमच भाजपचे कमळ फुलले. विद्यमान आमदार सनमडीकर यांचा पराभव झाला. या निवडणुकीत विलासराव जगताप यांनी सुरेश खाडे यांच्या विजयासाठी संपूर्ण तालुका पिंजून काढला. २००९ ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. १९६७ साली अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला जत विधानसभा मतदारसंघ २००९ ला खुला झाला.त्यामुळे मतदारसंघात राजकीय उलथापालथही मोठी झाली. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचा आघाडीचा  निर्णय झाला व काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली जतची  जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्यासाठी राष्ट्रवादीने ही जागा मागून घेतली होती. राज्य पातळीवरही यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यत बराचखल झाला. अखेर राष्ट्रवादीला जागा सुटल्याने जत काँग्रेस नाराज झाली. जत काँग्रेसमधील नेत्यांनी बंड करत तालुक्यात पाच विसर्जित करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रकाश शेंडगे यांना पाठींबा देऊन त्यांना निवडून आणले. 2014 मध्ये काँग्रेसच्या खेळीला कंटाळून विलासराव जगताप भाजपात प्रवेश केला. या निवडणुकीत मोदी लाट होती. या लाटेत सगळेच वाहून गेले आणि भाजप वासीय झालेले विलासराव जगताप एकदाचे आमदार झाले. नेहमी किंगमेकरची भूमिका बजावणारे जगताप यांना स्वतः ला जिंकण्यासाठी मात्र त्रास झाला. मोदी लाटेत त्यांना संधी मिळाली.
आता पुन्हा जगताप मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत, मात्र त्यांना भाजपमधूनच मोठा विरोध होत आहेत. त्यांच्या काही शिलेदारांनी त्यांची साथ सोडली आहे. प्रकाश जमदाडे, डॉ.रवींद्र आरळी, तम्मनगौडा रवी पाटील, प्रभाकर सनमडीकर आदी भाजपकडून इच्छूक आहेत. काँग्रेसकडून विक्रम सावंत प्रबळ दावेदार आहेत. इथे वंचित आघाडी आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.त्यामुळे इथे तिरंगी लढत होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र वंचित आघाडीचा उमेदवार उभा राहिला तर त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार आहे. गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची नावे  वंचित आघाडीकडून चर्चेत आहेत.

No comments:

Post a Comment