या सेवा पुरविण्याचे कार्य फार्मासिस्ट करतो. फार्मासिस्ट हा केवळ रुग्णांनाच नव्हे तर इतर आरोग्याशी निगडित असंख्य व्यावसायिकांना ज्ञान आणि सल्ला देणारे एक विश्वसनीय माध्यम आहे. ह्यसुरक्षित आणि प्रभावी औषधे म्हणजे नेमके काय ? यात फार्मासिस्टची नेमकी भूमिका कोणती ? मनुष्याच्या जीवनात औषधांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. औषधे रुग्णांना आजारातून मुक्त करून नवसंजीवनी देण्याचे काम करतात. जशी औषधे रुग्णांसाठी अमृत आहेत तशीच ते योग्य प्रकारे न घेतल्यास रुग्णांसाठी जीवघेणी देखील ठरू शकतात.
रुग्णांना औषधे वितरित करतांना फार्मासिस्टची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. फार्मासिस्ट योग्य रुग्णांना, योग्य औषधांचे, योग्य डोस देऊन, योग्य मार्गाने, योग्य वेळेवर औषधे घेण्याबद्दल सल्ला देतो. तसेच जर औषध योजनेमध्ये (प्रीस्क्रिप्शन) काही त्रुटी असल्यास त्या संदर्भात तो डॉक्टरांशी चर्चा करून बदल सुचवू शकतो. यामुळे औषधांमुळे रुग्णांच्या शरीरावर होणारे संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. म्हणजेच सुरक्षित औषधे रुग्णांना मिळाल्याने रुग्णांचे आजार बरे होतील. प्रत्येक औषधांचे आवश्यक परिणामांसोबतच काही अनावश्यक परिणामसुद्धा असतात. म्हणून अतियोग्य औषधे रुग्णांना देऊन औषधांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर होणारे अनिष्ट किंवा अनावश्यक परिणाम टाळणे फार्मासिस्टच्या ज्ञान कौशल्यामुळे शक्य आहे. कॅन्सर, हृदयरोग, डायबेटीस, या आणि अश्या अनेक दुर्धर जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करण्याचे उल्लेखनीय कार्य फार्मासिस्ट करतो.
बरेचशी औषधे 'नार्कोटिक्स अँड सायकोट्रोपिक्स अँक्ट' अंतर्गत येतात जसे की, मॉर्फीन, पेंटाझोसिन, अँफेटामिन इत्यादी औषधांच्या अधिक व अनधिकृत सेवनाने रुग्णांच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. ड्रग्स, झोपेच्या गोळ्या, गर्भ निरोधक आयपील, गर्भपातासाठीची एमटीपी किट्स, खोकल्याचे कोडीन सिरप यासारख्या मनुष्याला सवयी लावणार्या, मनुष्याच्या जीवावर बितणार्या औषधांचा होणारा अनधिकृत वापर, विक्री आणि वितरण यावर प्रतिबंध घालण्यासाठी भारतात 'औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम-१९४0' लागू करण्यात आला. दिवसेंदिवस नवनवीन आजार फोफावत आहेत. त्यावर नव्या औषधांचे संशोधन देखील होत आहेत. अनेक आजारांवरती प्रतिजैविकांचा रुग्णांवरती अनावश्यक वापर होत आहे. सर्दी, खोकला सारख्या आजारांवर होणारा प्रतिजैविकांचा अनावश्यक किंवा गैरवापर म्हणजेच भविष्यात त्यांना गमावणे होय. प्रतिजैविकांचा गैरवापर तसेच नियमित कोर्स पूर्ण न केल्यास प्रतिजैविकांचे प्रतिकार होण्याची शक्यता असते. प्रतिजैविकांचा कमीत कमी आणि योग्य वापर करणे तसेच प्रतिजैविकांचे प्रतिकार रोखण्याचे मुख्य कार्य फार्मासिस्टला करावयाचे आहे. रुग्णांना प्रतिजैविके कशी, आणि कधी घ्यायची, त्यांचे होणारे दुष्परिणाम, ड्रग्स-ड्रग्स इन्टेरॅक्शन, ड्रग्स-फुड इन्टेरॅक्शन याबद्दल फार्मासिस्ट माहिती देत असतो. भारतातील क्षयरोगाचे मोठे प्रमाण चिंतेची बाब आहे. क्षयरोगावरील डॉट्स प्रणाली रुग्णांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. परंतु त्याच बरोबर क्षयरोगांवरील औषधी प्रणालीतील प्रतिजैविकांचा प्रतिकार किंवा प्रतिरोध मोठय़ा प्रमाणावर होऊन मल्टिड्रग्स रेझिस्टंट ट्युबरक्युलॉसिसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही गंभीर समस्या आहे. क्षयरोग औषधांचे व्यवस्थापन करतांना देखील फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका असते. सर्वांसाठी सुरक्षित आणि प्रभावी औषधे रुग्णांना प्रदान करून आरोग्य यंत्रणेमधील फार्मासिस्ट हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे यात तिळमात्र शंका नाही.
No comments:
Post a Comment