डॉ.रवींद्र आरळी म्हणजे एक प्रसन्न आणि हसमुख व्यक्तिमत्त्व. डॉक्टरांनी हसून रुग्णाची आस्थेवाईकपणे चौकशी केली की त्याचा निम्मा आजार पळून जातो. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये लोकप्रिय असलेलं हे व्यक्तिमत्त्व समाजकारणातही तितकंच प्रभावीपणे वावरलं आहे. राजकारणापेक्षा समाजकारणात रममाण झालेलं हे व्यक्तिमत्त्व समाजाच्या आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी सतत झटत राहिलं आहे. भाजप पक्षाही निष्ठा ठेवून डॉ. आरळी राजकारण करत राहिले. त्याची पोहोच त्यांना पक्षाने वेळोवेळी पक्ष संघटनेत जबाबदार पदे देऊन केली आहे. पर्यटन विकास महामंडळावरही त्यांची वर्णी लावण्यात आली. त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली आहे.
राजकारणात राहून फक्त राजकारण करणारी मंडळी आपण पाहिली आहेत. त्यांचा समाजकारणाशी फारसा संबंध येत नाही. पण राजकारणात राहून समाजकारणात रममाण होणारी माणसे क्वचितच आढळून येतात. डॉ.रवींद्र आरळी या क्वचित व्यक्तिमत्त्वामध्ये येतात. त्यांनी सामाजिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. लायन्स क्लबसारखी आंतरराष्ट्रीय संघटना त्यांनी जतसारख्या दुष्काळी भागात आणून त्याचा विस्तार केला. सामाजिकतेची आवड असलेल्या लोकांना त्यांनी एकत्र आणले आणि त्यांच्याकडून समाजविकास घडवून आणला. सध्याच्या घडीला माणसाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. विविध आजारापासून लोकांनी दूर राहावे,यासाठी ते सातत्याने तालुका,जिल्हा आणि राज्यभर व्याख्यानं देत राहिले. सामाजिक भान ठेवत त्यांनी आपला डॉक्टरकीचा व्यवसाय चालवला.
जतमध्ये विशिष्ट एका आजारावर सूक्ष्मपणे उपचार करण्याची सोय नाही,ही बाब त्यांच्या लक्षात आली. जत हा दुष्काळी तालुका म्हणून पाचवीला पुजला गेला आहेच पण विस्तार क्षेत्रानेही मोठा आहे. इथल्या रुग्णांना मोठ्या, किचकट आजाराच्या उपचारासाठी शंभर-दोनशे किलोमीटर असलेल्या सांगली, सोलापूरला जावे लागते यात रुग्णांच्या नातेवाईकांचा आर्थिक आणि वेळेचा मोठा अपव्यय होतो. ही लक्षात ठेवून डॉ. आरळी यांनी जत येथेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. याचा लाभ तालुक्यातले रुग्ण घेत आहेत. नर्सिंग कॉलेज उघडून त्यांनी तालुक्यातल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभारण्याची संधी दिली. मुलीला एकटीला लांब शिकायला पाठवण्याचे दिवस राहिले नाहीत. आईबाप अशावेळेला मुलींची लग्ने लावून देतात. त्यामुळे इच्छा असूनही मुलींना शिकता येत नाही. व्यावसायिक शिक्षण घेता येत नाही. पण डॉ. आरळी यांच्यामुळे ही कसर भरून निघाली आहे.
लहान मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या केल्या. या माध्यमातून मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यासाठी सुसज्ज इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. समाजातील विविध क्षेत्रात त्यांनी चांगलीच भरारी घेतली आहे. राजकारण करत असताना सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. रक्तदान शिबिर, विविध आरोग्य तपासणी शिबिरे या क्षेत्रात त्यांचा सतत वावर असतो. संघटनांच्या माध्यमातून अशी शिबिरे भरवून रुग्णांना मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे डॉ. आरळी यांचा तालुक्यातल्या तळागाळातील लोकांपर्यंत संपर्क राहिला आहे.
समाजकारण करताना राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक विकास साधला जावा,यासाठी डॉ. आरळी यांनी जतच्या विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. वास्तविक भाजपची उमेदवारी त्यांनाच मिळणे आवश्यक असते, मात्र तसे घडले नाही. म्हणतात ना, राजकारणात काहीही घडू शकतं. तसंच डॉ. आरळी यांच्या बाबतीत घडले. त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही. काँगेस आणि राष्ट्रवादी तसेच भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हात दिला . आता त्यांचा प्रचार इतरांपेक्षा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तालुक्याला आधुनिक भारताशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ही संधी त्यांना मिळायला हवी आहे.
No comments:
Post a Comment