Wednesday, October 2, 2019

आता तिसऱ्या उमेदवाराची प्रतीक्षा

भाजप-काँग्रेसचे उमेदवार निश्चित;दोन्हीकडे नाराजी
जत,(प्रतिनिधी)-
भाजप आणि काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीतच जत विधानसभा मतदारसंघातील आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्याने अन्य इच्छूक मंडळींची धडपड थांबली असली तरी ही नाराज मंडळी काय पवित्रा घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. तिसरा उमेदवार निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित असले तरी तो दोन्हीकडील नाराज गटाकडून येणार की वंचित आघाडी आपला उमेदवार देणार,हाच प्रश्न बाकी आहे.


काँग्रेसने पहिल्यांदा आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. त्या पहिल्याच यादीत विक्रम सावंत यांच्या नावाला स्थान मिळाले. त्यांनतर काल भाजपने 125 जणांची यादी जाहीर केली,त्यातही जतच्या विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे जतच्या राजकारणात जी काही अटकले लावण्यात आली होती,त्याला लगेच पूर्ण विराम मिळाला. आता दोन्हीकडील नाराज लोकांचा काय पवित्रा असणार,याचा अंदाज बांधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट विक्रम सावंत यांचा प्रचार करणार नाही,असे पहिल्यापासूनच म्हणत आला आहे, तर भाजपमधील इच्छूक किंवा नाराज गट भाजप उमेदवाराचा प्रचार करणार की, तिसरा पर्याय उभा करणार हे पाहावे लागणार आहे.भाजपमध्ये इच्छूक मंडळींची संख्या या वेळेला मोठी होती. शेवटी सत्ता महत्त्वाची असते.  विलासराव जगताप यांची साथ सोडून अनेकजण आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न चालवले होते. यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, जि. प. शिक्षण सभापती तम्मणगौडा रवीपाटील, प्रभाकर जाधव  आघाडीवर होतेच,पण त्याशिवाय भाजपच्या जुन्या फळीतील डॉ.रवींद्र आरळी यांनीही आपला सूर बदलला होता. विद्यमान आमदार जगताप यांना उमेदवारी दिली जाऊ नये, अशी त्यांची मागणी होती. डॉ. आरळी यांना जगताप यांचा प्रचार करण्याशिवाय पर्याय नसला तरी त्यांचा आतला आवाज कोणासाठी धडपडणार,असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
तिसरी आघाडी करून उमेदवार देण्याची खलबते चालली होती. आता त्याला आणखी पंख फुटतील की वंचित आघाडीला बळ दिले जाणार ,याची खमंग चर्चा सध्या सुरू असून यासाठी अशोक बन्नेनवर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विलासराव जगताप, विक्रम सावंत, प्रकाश शेंडगे अशी तिरंगी लढत झाली होती. मोदी लाटेत विलासराव जगताप विजयी झाले असले तरी विक्रम सावंत यांनी चांगली लढत देत पन्नास हजारांहून अधिक मते खेचली होती. सावंत यांना नातेवाईक असलेले डॉ. पतंगराव कदम यांची सर्वच दृष्टीने वरदहस्त होता. पण त्यांच्या निधनामुळे सावंत यांनी बाजू थोडी कमकुवत झाली आहे, पण मावसभाऊ व पलूस-कडेगाव मतदार संघातील काँग्रेसचे  उमेदवार विश्वजीत कदम यांचे पाठबळ त्यांना मिळणार आहे. काँग्रेसचा मोठा गट सावंत यांच्या पाठीशी असला तरी नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीचा एक गट विरोधाची भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानटोचणीचा काही परिणाम या गटावर झाल्यास तालुक्यात तुल्यबळ लढती होण्यास मदत होणार आहे. तालुक्यात शिवसेना फारच मर्यादित आहे. त्यांच्या असण्या-नसण्याचा कोणालाच काही परिणाम होणार नाही. सध्याच्या परिस्थितीत तिसरा उमेदवार कोण असणार,यावर बरेच गणित अवलंबून असणार आहे.

No comments:

Post a Comment