Friday, October 25, 2019

तंटामुक्त, गाव समित्या कागदावरच

जिल्ह्यातील स्थिती;गावोगावी भांडणे, तंटे सुरूच
जत,(प्रतिनिधी)-
गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. मात्र खऱ्या अर्थाने ही यशस्विता कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली आहेत,त्याच गावात हाणामाऱ्या होत आहे. समित्या फक्त कागदावरच राहिल्या आहेत.
स्वच्छता अभियान असो किंवा निर्मलग्राम असो किंवा तंटामुक्त गाव असो अशा विविध योजनांसाठी गावोगावी अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या समित्यांचा काहीच उपयोग गावांना होताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी जत तालुक्यातील बहुतांश गावे निर्मलग्राम झाली. मात्र आज या गावाची परिस्थिती पाहण्याजोगी झाली आहे.
लोक आजही उघड्यावर शौच करताना आढळून येत आहे. सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने चोरटी दारू विक्री केली जात आहे. यामुळे गावाला मिळालेले पुरस्काराचे महत्त्व लोकांपर्यंत व्यवस्थित पोहचले नसल्याचेच स्पष्ट होते. तंटामुक्त योजना ग्रामीण भागात राबवण्यात आली असली तरी आज गावात कोणत्या ना कोणत्या सतत भांडणे होताना दिसतात. त्यामुळे पोलिसांचे काम वाढले असून पोलिसांचा हस्तक्षेपही वाढला आहे. यामुळे भ्रष्टाचाराचे कुरण वाढले आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अशा विविध ग्रामीण भागातील शांतता, स्वच्छता व व्यसनाधीनता दूर करण्याचा प्रयत्न व्यावसायिकतेच्या स्वरूपात स्वीकारल्याचे दिसून येत आहे. तंटामुक्तीचा पुरस्कार असो किंवा  किंवा निर्मालागावाचा पुरस्कार असो ,तो गावाला प्राप्त झाल्यावर गावातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी त्या समस्येकडे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.
कोणत्याही समस्यांचे उच्चाटन करण्यासाठी शासनाकडून नेहमीच प्रयत्न केला जातो. मात्र ज्यावेळी कोणताही योजना किंवा अभियान गावपातळीवर राबवण्यात येते. त्यावेळी त्या योजनेकडे व अभियानाकडे पाहण्याचा हेतू बदललतो. अभियानात सहभागी व्हायचं आणि पुरस्कार मिळवायचा,हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले जाते. अधिकारी गावात येणाऱ्या दिवशी गावात स्वच्छता करून अधिकाऱयांच्या स्वागतासाठी गावकरी जमा होतात. संपूर्ण गावाला नववधू सारखे सजविले जातात. मात्र ती खरी वास्तविकता नसते. निर्मलग्राम  झालेल्या गावात कचऱ्याचे  ढिगारे ,तुंबलेलीगटारे दिसतात. तर तंटामुक्त झालेल्या गावात तंटे  त्याचबरोबर दारूबंदी झालेल्या गावात पुन्हा चोरटी दारू विक्री आदी प्रकार दिसून येतात. काही मूठभर लोकांनी काही मूठभर लोकांमुळे अनेक गावांना मिळालेल्या  पुरस्काराला कलंक लागला आहे.
गठीत समित्या कागदावरच
तंटामुक्त मोहिमेकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे तंटे वाढत असून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि समित्याही याबाबत उदासीन आहेत. खऱ्या अर्थाने आदर्श गावाची निर्मिती करावयाची असेल तर राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा तंटामुक्त चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. यामुळे गाव परिसरातील वाद गावातच मिटू शकतील.

No comments:

Post a Comment