एखादी वाईट गोष्ट झाली किंवा नैराश्यामधून आत्महत्या करणार्यांच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो पण पुण्यामधील एका वृद्ध दांपत्याने सुखी आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपले आता या जगात काहीच काम नाही त्यामुळे आपण आयुष्य संपवायला हवे या भावनेतून वृद्ध दांपत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. दिवाळीच्या आधी घडलेल्या या घटनेमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वृद्धा दांपत्यापैकी आत्महत्या केलेले गृहस्थ हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी गृहिणी आहे. या दोघांनाही दोन उच्चशिक्षित विवाहित मुली आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झाल्यानंतर सर्व काही आनंदात सुरू आहे. आपल्या आयुष्यामध्ये सर्वच छान असून जगण्याचा हेतू पूर्ण झाला आहे. आता आपली प्रकृतीही ठणठणीत आहे मात्र वय वाढत जाणार तसे आजारपणे सुरू होऊन त्याचा सर्वांनाच त्रास होऊ शकतो. त्यामुळे आजारपणाने जीवन संपवण्यापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवू अशी चर्चा या दांपत्यामध्ये झाल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. अनेक दिवस ते या निर्णयावर चर्चा करत होते. आपल्या आत्महत्येनंतर कोणालाही चौकशीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आत्महत्येपूर्वीच चिठ्ठीही लिहून ठेवली होती. अखेर 22 ऑक्टोबर रोजी त्यांनी राहत्या घरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आत्महत्या करत आहोत असा मेसेज या दांपत्याने पुतण्याला पाठवला. हा मेसेज वाचून पुतण्याला धक्काच बसला. त्याने तातडीने यासंदर्भातील माहिती 100 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना दिली. मात्र तोपर्यंत महिलेने आपली नस कापून पंख्याला गळफास घेतला होता. आपल्या पत्नीचा मृत्यू झाला असे समजून या वृद्धाने तिचा मृतदेह खाली उतरवून गळफास घेतला.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच दोन पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घरी पोहोचले तेव्हा महिला जमिनीवर पडलेली होती तर त्या महिलेचा पती गळफास घेतलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेले पहायला मिळाले. पोलिसांनी तातडीने या दोघांनाही जवळच्या रुग्णालयात हलवले पण तोपर्यंत वृद्धाचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिली गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच दांपत्याच्या नातेवाईकांनी आणि मुलींनी रुग्णालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
No comments:
Post a Comment