राज्यात 1972 ते 1977 या काळात सर्वाधिक म्हणजे 28 महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही विधानसभा निवडणुकीत इतक्या संख्येने महिला आमदार निवडून आलेल्या नाहीत. आताच्या निवडणुकीत 24 महिला आमदार निवडून आल्या आहेत. 2014 मध्ये 20 महिला आमदार निवडून येऊन विधानसभेत पोहचल्या होत्या.पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र अशी राज्याची ओळख असली तरी सुमारे सहा दशकांच्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात अद्यापही महिलेला मुख्यमंत्रिपद मिळालेले नाही.
राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून शिवसेना भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपाला 105 शिवसेनेला 56 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54, काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला आहे. यावेळी निकालातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. यावेळी विधानभवनात महिला आमदारांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत विधानसभेतील महिला आमदारांची संख्या 20 होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून आता 24 महिला आमदार विधानसभेत आपापल्या मतदारसंघाचे नेतृत्व करणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेतील महिला आमदार असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी विधानसभेतील विरोधी
पक्षनेतेपद, मंत्री आणि देशातील सर्वोच्च असलेल्या राष्ट्रपती पदापर्यंत यशस्वी मजल मारली आहे. यंदाच्या निवडणुकीत 12 विद्यमान महिला पुन्हा निवडून आल्या आहेत.त्यापैकी आठ आमदार सत्ताधारी भाजपच्या, तीन काँग्रेसच्या आणि एक राष्ट्रवादीची आमदार आहे. विधानसभेत पुन्हा निवडून येणाऱ्या महिला आमदारांमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमनताई पाटील यांचा समावेश आहे. विधानसभेत प्रथम निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे, अदिती तटकरे, शिवसेनेच्या लता सोनावणे व यामिनी जाधव, तर भाजपच्या मुक्ता टिळक, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, सुलभा खोडके तसेच गीता जैन (भाजप बंडखोर) आणि मंजुळा गावित (अपक्ष) यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment