जत तालुक्याला पाणी महत्त्वाचे आहे. पाणी असेल तर शेतकरी शेती करू शकतो. त्यामुळं चार मजुरांना काम मिळते. पाण्यामुळे लहान मोठे फळ प्रक्रिया सारखे उद्योग उभारले जाऊ शकतात. पाण्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. जत तालुक्यात बाहेरून पाणी सहजगत्या येऊ शकते, हे आता स्पष्ट झाले आहे. राजकारण्यांनी पाण्याची व्यवस्था केली तर बाकीचा विकास त्यांना करावा लागत नाही,तो आपोआप होतो. आता काही भागात पाणी पोहचले आहे. जत तालुक्यात सर्वच भागात पाणी खळाळल्यास राजकारण्यांना फार काही करावं लागणार नाही. पण गेल्या पन्नास साठ वर्षात पाणी देण्याचे आश्वासनच इथल्या लोकांना ऐकावे लागले आहे. सध्या तालुक्याच्या एका कोपऱ्यात पाणी आले आहे. संपूर्ण तालुक्यात पाणी कधी खळाळणार हा प्रश्नच आहे.
तालुक्याला सर्वात मोठी गरज आहे ती सिंचन योजनांची! सध्या म्हैसाळ योजना ही तालुक्यातील ६८ गावांमध्ये पोहचलेली आहे . 120 गावांच्या जत तालुक्यातल्या राहिलेल्या गावांना ती मिळायला हवी. तालुक्याच्या सिमेवरून जाणारी टेंभू योजनेमध्ये जत पश्चिमेस असणाऱ्या वाळेखिंडी,बेवनूर,बागलवाडी, नवाळवाडी या या गावांचा समावेश केल्यास पाणी काही गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच जत पूर्व भागातील ४२ गांवात भिमा आणि म्हैसाळची सिंचन योजना पोहचवण्याची गरज आहे.प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे.
जत तालुक्यामध्ये सध्या रस्त्याचा प्रश्न निकाली निघत आहे. पाच राष्ट्रीय महामार्ग (हाय वे )मार्ग मंजूर आहेत. त्यातील काहींचे काम सुरू आहेत. मात्र या कामना गती येण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दैना अद्याप संपलेली नाही. मोठमोठे खड्डे, वर्षानुवर्षे तेच खडीकरणाचे रस्ते यामुळे जतकरांचे मणके, कंबर खिळखिळे झाले आहेत. गेल्या पाच वर्षात जत तालुक्यात कराड-तासगाव-जत (एन एच २६६),गुहाघर- विजापूर (एन एच १६६ई), इंदापूर-जत (एन एच ९६५ जी),पंढरपूर -उमदी-विजापूर (एन एच ५१६अ) या राष्ट्रीय महामार्गाची कामे चालू असुन गोकाक-अथणी-जत या राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अहवाल (DPR) बनवायचे काम हे कर्नाटकातील विजयपूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात सुरू असुन त्याचे काम लवकर सुरू होईल अशी आशा आहे.
जत तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळे सर्वागीण विकासाठी राष्ट्रीय महामार्गाबरोबर अजून बेळगाव-गुड्डापूर-पंढरपूर आणि पंढरपूर -जत-बागलकोट दोन्हीही राष्ट्रीय महामार्ग मंजूर व्हायला हवेत. त्याचबरोबर कराड-जत २६६ई या राष्ट्रीय महामार्गाची लांबी झळकी पर्यत वाढवल्यास क.मंहकाळ ड्रायपोर्ट हे उमदी मार्गाने सोलापूर-बेल्लारी इकॉनामिकल काॕरिडोरशी जोडला जाईल. या राष्ट्रीय महामार्गाचीही मागणी होत आहे .
राष्ट्रीय महामार्गाबरोबरच मिरज-जतरोड-लातूर हा ब्रिटिश कालिन रेल्वे मार्ग विद्युतीकरण होण्याची गरज आहेच शिवाय हा रेल्वे मार्ग जत शहरापासून कसा जाईल,याचाही अभ्यास व्हायला हवा. मुंबई पुणे अश्या मोठ्या शहरात जत तालुक्यातील नागरिकांची संख्या ही लक्षणीय आहे त्यामुळे जतरोड मार्गाने मिरज-पंढरपूर-मुंबई 'माऊली सुपर फास्ट एक्सप्रेस' नविन रेल्वे सोडण्याची मागणी आहे ती पूर्णत्वास यायला हवी. तसेच पंढरपूर -उमदी-विजयपूर आणि मिरज-जत-विजयपूर रेल्वे मार्ग पूर्ण करावेत पण हे सर्वच रेल्वे मार्ग तालुक्याच्या सिमेवरून जात असल्याने तालुक्याच्या मध्य भागातून जाणारा जमखंडी-गुड्डापूर-पंढरपूर असा सुद्धा रेल्वे मार्गाचा सर्व्ह करण्यात यावा अशीही संख-माडग्याळ परिसरातील जतकरांची इच्छा आहे.
जत तालुक्यातील स्थलांतर थांबविण्यासाठी तसेच दुष्काळी भागाचा विकास करण्यासाठी जतला पंचतांराकित एमआयडीसीची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. ही एमआयडीसी धावडवाडी- गुळवंची-सिग्नहळ्ळी या तालुक्याच्या पश्चिम उत्तर भागात करावी तसेच उमदी येथे लघू आणि मध्यम एमआयडीसीचीही मागणी जतच्या पूर्व भागातून होत आहे .
जत तालुक्यात जत आणि माडग्याळ ठिकाणी सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरतो. जतच्या बोकडांचे मटण मोठे चविष्ट असल्याने सांगली,कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांबरोबरच आंध्रप्रदेश आणि कर्नाटक भागातून व्यापारी या बाजारात बोकड खरेदी करण्यासाठी येत असतात. या भागात बोकडाच्या मटणाचा उद्योग उभारल्यास त्याचा फायदा होईल. माडग्याळ मेंढीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यांच्या पैदासीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
तालुक्यात डाळींब आणि द्राक्षे यांची शेती वाढीस लागण्याची गरज आहे. डाळींब आणि बोर प्रक्रिया उद्योग उभारल्यास उत्पादनात वाढ होईलच शिवाय ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवून जाईल. तालुक्यात रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने छोटे मोठे उद्योग यायला हवे आहेत.
जत शहराला अनेक समस्यांनी जखडले आहे. प्रभागात सुविधांची वानवा आहे. भाजीपाला मंडई, मटण मार्केट, अद्ययावत व्हायला हवे. याशिवाय जत नगरपालिकेची इमारत बनणे आवश्यक आहे. जत नगरचना विभाग, जत अग्निशामक दल, जत नगरपालिकेचा स्वतंत्र दवाखाना, नगरपालिकेचे क्रिडा संकुल, सोलनकर चौकात प्रशस्त बसस्थानक, नगरपालिकेचे प्रशस्त उद्यान तसेच शहरात भुयारी ड्रेनेज आणि विद्युतीकरण होणे महत्त्वाचे आहे.
जत तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर दोन तालुक्याची निर्मिती आवश्यक आहे. जत पूर्व भागातील जतकरांची ही मोठी गरज आहे. यासाठी जत पूर्व भाग हा स्वतंत्र तालुका करण्याची मागणी प्रलंबित आहे. त्याचबरोबर जत पूर्व भागाची स्वतंत्र पंचायत समिती व्हायला हवी. जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या आणि राष्ट्रीय मार्गावर असलेल्या उमदी या ठिकाणी एस टी आगार उभारण्याची गरज आहे. जत पूर्व भागाचा कायापालट करायचा असेल तर सार्वजनिक बांधकाम उपविभागिय कार्यालय उमदी परिसरात व्हायला हवे. त्याचबरोबर जत पूर्व भागासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन व्हायला हवी. उमदी-संख येथील ग्रामस्थांना खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते, तरी उमदी किंवा संख येथे दुय्यम निबंधक कार्यालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी आहे.
उमदी येथे स्वतंत्र पोलीस ठाणे देखील आहे,तेथील आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यासाठी पन्नास किलोमीटर अंतर पार करून जत येथील कोर्टात हजर करावे लागते तरी उमदी किंवा संख येथे स्वतंत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. जत पूर्व भागातील ग्रामस्थांना शेती संबंधित मोजणीचा अर्ज करण्यासाठी,घराचा उतारा
शेती संबंधित नकाशे काढण्यासाठी जत येथील भुमी अभिलेख कार्यालयात यावे लागते.तरी उमदी किंवा संख येथे भुमी अभिलेख कार्यालयाची स्थापना करण्याची गरज आहे. जत तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राजकीय इच्छा शक्ती महत्त्वाची आहे. नाही तर आतापर्यंत पन्नास साठ वर्षे अशीच गेली आहेत. आणि यापुढेही जात राहतील. तालुक्याला बसलेला दुष्काळाचा पुसला जायला हवा आहे.
No comments:
Post a Comment