Friday, October 18, 2019

जत मतदार संघात काट्याची तिरंगी लढत

जत,(प्रतिनिधी)-
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्यात आली आहे. जत विधानसभा मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत होत आहे. भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत आणि भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उभा राहिलेले डॉ. रवींद्र आरळी यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. निवडणुकीचा प्रचार गावागावात आणि घराघरात पोहचला आहे. सगळ्यांनाच कोण जतचा आमदार होणार याची उत्सुकता लागली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत आमदार विलासराव जगताप सुमारे 70 हजार मते घेऊन निवडून आले होते. काँगेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांनी नवखे असतानाही सुमारे पंचावन्न हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना तीस हजार मते मिळाली होती. आमदार जगताप सुमारे सतरा हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. यंदाही जत विधानसभा मतदारसंघात तिरंगीच लढत आहे. मात्र यांखेपेला कोणती लाट वगैरे काही नाही. भाजप काश्मीर राज्यातील 370 कलम आणि ट्रिपल तलाक या दोन मुद्द्यावर जोर देत निवडणुकीत बाजी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. आमदार जगताप यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडुरुप्पा यांच्या सभा झाल्या आहेत. रस्ते आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना यांच्यावर सर्वाधिक निधी खर्च झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. पूर्व भागातील 48 गावांसाठी पाणी योजना राबविण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
भाजपचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवीपाटील, प्रभाकर जाधव, शिवाजीराव ताड आदी मंडळींनी जगताप यांच्याशी फारकत घेऊन डॉ. आरळी यांच्या प्रचाराचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे जगताप यांनी प्रचाराची सर्व मदार सुनील पवार आणि सरदार पाटील यांच्यावर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमदार जगताप यांचा प्रत्यक्ष मतदारांशी फार संपर्क कमी आहे. याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी चे होर्तीकर यांचा भाजप प्रवेश, जनसुराज्य पक्षाचे  बसवराज पाटील यांची कितपत साथ मिळेल,हे पाहावे लागणार आहे.
काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत पुन्हा एकदा निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. मोदी लाट आणि नवखा उमेदवार असतानाही 2014 मध्ये तब्बल 55 हजार  मते घेऊन भावी आमदार म्हणून आपली चुणूक दाखवली होती. या खेपेला त्यांना मतदारांची सहानुभूती मिळणार का, हे पाहावे लागणार आहे. विक्रमसिंह सावंत यांनी जमेची बाजू म्हणजे त्यांचा तळागाळातील मतदारांचा थेट संपर्क आहे. एक शांत ,निर्गर्वी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात आणि विश्वजीत कदम यांच्या सभा झाल्या आहेत. विश्वजीत कदम यांनी जत तालुक्याला आपला मतदार संघ असतानादेखील अधिक वेळ देऊन वातावरण चांगलेच तापवले आहे.
निष्ठावान भाजपमधील डॉ. आरळी यांना उमेदवारी देताना डावलण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी साथ दिल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. डॉ. आरळी लिंगायत समाजाचे असल्या कारणाने आतापर्यंत या समाजाचा आमदार झाला नाही, असा मुद्दा घेऊन प्रचार चालवला जात आहे. मागील खेपेला माजी आमदार शेंडगे यांनाही धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणात मिळतील, असे म्हटले जात होते, मात्र तसे झाले नाही. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. डॉ. आरळी यांची सगळी मदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांच्या हातात आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असली तरी त्याचे मतात कितपत परिवर्तन होते पाहावे लागणार आहे. तिरंगी काट्याच्या लढतीत बाजी कोण मारणार हे, येत्या 24 तारखेलाच कळणार आहे.

No comments:

Post a Comment