Thursday, October 31, 2019

खाकी वर्दी आहे; पण सन्मान नाही!

होमगार्डसना सेवेत सामावून घेण्याची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
पोलिस दलाला अटीतटीच्या काळात महत्त्वाचे पात्र ठरणार्‍या होमगार्डची व्यथा कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करून करीत नाही. राज्यात 42 हजार होमगार्ड्स आहेत. त्यांना कधीही, केव्हाही कामावर बोलावले जाते. त्यांची वर्षातून दोन-अडीच महिने भरतात. त्यात त्यांना मिळत असलेल्या तुटपुंज्या मानधनात आपले समाधान करून घ्यावे लागते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता लागलेली असताना होमगार्ड असूनसुद्धा त्यांना अभिमान बाळगता येत नाही. त्यामुळे ही ओळख लपवत वेठबिगारी म्हणून कामावर जावं लागतं. स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबासाठी पाणावलेल्या डोळ्यांनी प्रत्येक होमगार्ड आपली व्यथा मांडताना दिसून येतो.

पाहता क्षणी आश्‍वासक वाटणार्‍या खाकी वर्दीचे आकर्षण प्रत्येकालाच असते. पण वर्दी परिधान करण्याचे भाग्य प्रत्येकालाच लाभते असे नाही. धर्म, भाषा, जातपात यासारखे भेदभाव न करता समाजातील प्रत्येक क्षेत्रातील होतकरूंनी इच्छा असेल, तर स्वयंप्रेरणेने खाकी वर्दी घालून समाजसंरक्षणाची संधी गेली 70 वर्षे होमगार्डसने उपलब्ध करून दिली आहे.
होमगार्ड भारतातील एक सैनिकीसम स्वयंसेवी पोलिस संघटना आहे. भारतीय पोलिस दलाला साहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे. शहरातील व्यापार-व्यवहारच नव्हे, तर सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेबरोबर शांततेची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असताना आणीबाणीच्या वेळी तसेच प्रशासकीयदृष्ट्या आव्हानपर, प्रसंगी पोलिस दलावर वारंवार ताण पडतो. प्रशासनाला, निमलष्करी दलांना स्थानिक पोलिसांच्या दिमतीला तैनात करावे लागते. या परिस्थितीचा विचार करून अशांत व अस्थिर परिस्थितीत प्रशासकीय वा पोलिसी प्रयत्नांना जनतेचा सहभाग आणि प्रयत्नांची स्वयंसेवी स्वरूपात साथ मिळावी, या उद्देशाने मुंबईचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी प्रथम नगरसेना म्हणजेच 'होमगार्ड' नावाने शिस्तप्रिय स्वयंसेवक संघटनेची स्थापना केली.
एका कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी काही होमगार्डची नेमणूक करण्यात आली. तिथे एका होमगार्डशी संवाद साधला असता त्याने आपली व्यथा सांगताना त्याच्या भावना अनावर झाल्या. त्यामुळे आणखी काही होमगार्ड एकत्र आले. त्या प्रत्येकाने आपल्या व्यथांना शब्दरूप देत भावना मोकळ्या केल्या. आम्हाला वर्षाचे 365 दिवस काम दिले जात नाही. कधीही बोलावले जाते. तेवढय़ाच दिवसांचे तुटपुंजे मानधन दिले जाते. असे वर्षातून कामाचे दोन-अडीच महिने भरतात. मग इतक्या पैशांत चूल कशी पेटणार, मुलांना काय खाऊपिऊ घालणार, त्यांना शिकवायचं की नाही, अशा अनेक प्रश्नांचा डोंगर आमच्यासमोर असतो. त्यामुळे आम्ही आणि इतर सगळ्याच होमगार्डसना इतर कामे शोधावी लागतात. कोणी बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून जातो, कुणी किराणा दुकानात, तर कोणी पिठाच्या गिरणीत हेल्पर म्हणून काम करताना दिसतो. त्यातल्या त्यात दिवाळीसारख्या सणाला पगार न झाल्याने आमची दिवाळी अंधारात गेली. या व्यथा आम्ही कोणाकडे मांडायच्या? असे होमगार्ड सांगत होते. संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून समाधान शोधणे गरजेचे आहे.महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेसाठी आम्हांला तैनात केले जाते. हातात काठी दिली जाते. परंतु, दंगाप्रवणस्थळावर अधिकार्‍यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आम्हांला आमच्या स्वसुरक्षेचा प्रश्न असतो. मग आमचा वचक राहणार कसा? गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवणार कशी? त्यामुळे आम्हांला समोरच्या व्यक्तीला 'दादा-भाऊ' म्हणत परिस्थिती सांभाळावी लागते.

No comments:

Post a Comment