Tuesday, October 29, 2019

माजी आमदार जयंत सोहनी यांचे निधन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याचे माजी आमदार अ‍ॅड. जयंत सोहनी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. जत विधानसभा  मतदार संघातून त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. पेशाने वकील असलेले सोहनी हे मूळचे आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे होते. दुष्काळी तालुक्यांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.
अँड जयंत ईश्वर सोहनी हे जत विधानसभा मतदार संघातून सलग दोनवेळा निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व जतचे राजे श्रीमंत विजयसिंह डफळे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. तालुक्यातील तलाव, जलसंधारणाची कामे, रस्ते, दळण-वळण आदी महत्वाची कामे त्यांच्या काळात झाली. 
नाशिक जिल्ह्यातील पहिने या आदीवाशी गावी त्यांचा जन्म 15 मार्च 1931 रोजी झाला.  शिक्षण बी. ए. एल. एल. बी झाले. नोकरीनिमित्त ते जतमध्ये आले. आरोग्य विभागात ते नोकरीस होते. मात्र नोकरीत त्यांचे मन फारकाळ रमले नाही. कायद्याची पदवी घेतली असल्याने नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी जत न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला. त्यामुळे ते अल्पावधीत सर्वपरिचित झाले. त्याकाळी जत विधानसभेसाठी एस. टी. बामणे यांना पर्याय म्हणून उच्चशिक्षीत अनुसुचित जातीमधील उमेदवाराचा शोध सुरू होता पं.स.चे तत्कालीन उपसभापती माणिकराव कोडग हे अॅड. सोहनींना घेऊन जतचे राजे श्रीमंत विजयसिंह डफळे यांच्याकडे गेले. त्यांनी अॅड. सोहनी यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून राजेसाहेबांकडे शिफारस केली. 1978 साली राजेसाहेब हे रेड्डी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी अॅड. जयंत सोहनी यांना रेड्डी काँग्रेसची उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात तत्कालीन आमदार एस. टी. बामणे हे इंदीरा काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यावेळी अॅड. सोहनी यांचा एकतर्फी विजय झाला. विद्यमान आमदारांना पराभूत करून ते निवडून आले. अॅड. सोहनी आमदार झाल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक उलथा- पालथी झाल्या. वसंतदादा पाटील विरोधात शरद पवार असा वाद पेटला होता. पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोद आघाडी स्थापन केली. विधानसभा कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच बरखास्त करण्यात आली. अॅड. सोहनी यांना
पहिल्यावेळी दोन वर्षेच आमदारकीची संधी मिळाली.
जानेवारी 1980 ला पुन्हा विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. सर्व काँग्रेसचे एकीकरण झाले. जत मधील काही नेत्यांनी अॅड. सोहनी यांच्या उमेदवारीस विरोध केला. हे प्रकरण वसंतदादा यांच्याकडे गेले. मात्र विद्यमान आमदार म्हणून अॅड.सोहनी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली, त्यांच्या विरोधात जनता पार्टीचे दिलीप संकपाळ (डफळापूर) हे उमेदवार होते. काँग्रेसच्याच काही नेत्यांनी अॅड. सोहनी यांच्या विरोधात प्रचार केला. श्रीमंत विजयसिंह राजे यांनी तालुकाभर प्रचाराची धरा सांभाळली. त्यामुळे सुमारे पंचवीस हजार मतांनी अॅड. सोहनी विजयी झाले. तो काळ राजकीय संघर्षाचा होता. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील विरोधात बॅ. ए. आर. अंतुले असा संघर्ष सुरू होता. अंतुले यांच्या मंत्रीमंडळात अॅड. सोहनी यांना
मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली. अॅड. सोहनी हे वसंतदादा पाटील यांचे कट्टर समर्थक होते. दादांच्या प्रेमापोटी त्यांनी मंत्रीपदाच्या संधीवर पाणी सोडले. अपूर्ण पाटबंधारे तलाव, जलसंधारण, रस्ते आदी कामे मोठ्या प्रमाणात त्यांनी केली. राजकारणापेक्षा त्यांनी मुल्ये व निष्ठेला अतिशय महत्व दिले. त्यामुळे आमदारकीनंतर त्यांनी राजकीय जीवनाला रामराम करून पुन्हा वकीली सुरू केली. अनेक वर्षे वकिली
केल्यानंतर आता त्यांनी राजकीय व सामाजिक जीवनापासून सन्यास घेतला आहे.

No comments:

Post a Comment