Thursday, October 24, 2019

बँके मॅनेंजर ते आमदार

जतच्या राजकारणात आणि समाजकारणात सावंत घराण्याचे योगदान खूप मोठे आहे. गेल्या अनेक दशकापासून हे घराणे जतेच्या राजकारणात मातब्बर समजले जाते. परंतु याच घराण्याचे तिसरे वारसदार विक्रमसिंह सावंत यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणात भाजप तथा विलासराव जगताप यांच्या गटाला झुंज देत अखेर तालुक्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारती बँकेचा शाखाधिकारी, जिल्हा बँकेचा संचालक, जिल्हा परिषदेचा सदस्य ते आमदार पदापर्यंत त्यांनी केलेला प्रवास थक्क करणारा आहे. विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांनी ऑक्टोबर २०१९ च्या निवडणुकीत जत मतदारसंघातून तब्बल ३५ हजाराचे मताधिक्य घेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बी. कॉम. चे शिक्षण पूर्ण केलेले सावंत हे सुरुवातीस जतच्या राजकारणात सक्रीय नव्हते. भारती बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून नोकरी करीत असतानाच, त्यांनी गेल्या पंधरा वर्षापूर्वी जतेत सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीस त्यांनी उमदी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवली.
त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्यांदा ते संख गटात झेडपीच्या निवडणुकीत उतरले येथेही त्यांना पराभवास समोरे जावे लागले. या दोन पराभवानंतर २०१४ च्या मोदी लाटेतही त्यांनी जतची खुली विधानसभा लढली होती. यावेळीही त्यांनी लक्षवेधी मते घेतली, परंतु आ. जगताप यांच्याकडून त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. राजकारणात सतत अपयश येवूनही त्यांनी आपले काम आणि पक्ष बांधणी सोडली नाही. अखेर दोन वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना उमदी गटातून विजय मिळाला होता. त्यानंतर लागलीच त्यांनी जिल्हा बँकेतही आ.जगताप यांचे पूत्र मनोज जगताप यांना पराभूत करत दुसरा विजय मिळवला, जिल्हा परिषदेच्या विजयापासून सुरू झालेला विजयी घौडदौड आणि त्यांचे नेतृत्व सतत मोठे होत गेले. बाजार समिती, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये त्यांनी पडझडीला आलेल्या काँग्रेसला उभारी दिली. आणि अपेक्षेप्रमाणे २०१९ च्या विधानसभेत त्यांनी विदयमान आमदार विलासराव जगताप यांचा तब्बल ३५ हजाराच्या मताधिक्यांनी पराभव करीत जतेचा गड ताब्यात घेतला. बँकेत क्लार्क म्हणून नोकरी करणारा हा तरूण अवघ्या पंधरा वर्षात जत मतदार संघाचा लोकप्रतिनिधी पुढे आला आहे. सावंत यांनी पंधरा वर्षापासून हातातून गेलेला काँग्रेसचा गड ताब्यात घेतानाच सावंत घराण्याचेही वर्चस्व सिध्द करून दाखवले आहे.

No comments:

Post a Comment