जत,(प्रतिनिधी)-
विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीमध्ये प्रशासनाचे व आरोग्य विभागाचे जत शहरातील डेंगूच्या साथीकडे दुर्लक्ष होत असून या दुर्लक्षामुळे शहरातील डेंगूच्या साथीसह साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे.ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने युध्द पातळीवर प्रयत्न करावेत अशी मागणी जत शहरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
दिवसभर कडक ऊन,रात्री पाऊस अशा हवामानामुळे शहरात साथीच्या रोगांचा फ़ैलाव झाला असून डेंग्यूच्या साथीचाही प्रादुर्भाव झाला आहे. जत शहाराती रस्ते, उपनगरे दलदलीने माखले आहेत. जागोजागी कचरा पडला असून कचऱ्याचा उठाव झाला नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरात पन्नासहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. याकडे नगरपरिषद प्रशासन आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
जत नगरपरिषदेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जत शहराला पाणी पुरवठा करणारे बिरनाळ तलावात पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध असतानाही जत नगरपरिषदेकडून जत शहरात आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शहरातील नागरिक हे पाणी साठवून ठेवण्यासाठी सिंटेक्स टाक्या व सिमेंट टाक्यासह अन्य साधनाचा वापर करतात. या साठवलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात व त्यामुळे डेंगूच्या डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होवून डेंगूच्या साथीचा फैलाव वाढू लागला आहे.
जत नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यानी डेंगूच्या साथीविषयी नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असताना त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जत शहरातील सर्वच प्रभागामध्ये नगरपरिषदेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. जागोजागी कचरेचे ढीग पहावयास मिळत आहेत. गटारी जागोजागी तुंबलेल्या पहावयास मिळत आहेत. त्यामुळे शहरात सर्वच प्रभागामध्ये अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. शहरात आरोग्याचा बोजवारा उडालेला असताना प्रशासनाला व आरोग्य विभागाला याचे गांभीर्य राहीलेले नाही. डेंगूच्या साथीने जत शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील एका खासगी हाॅस्पीटल मध्ये काम करणारे महिलेचा नुकताच बळी गेला आहे. जत शहरात शेकडो लोकांना डेंगूच्या आजाराने ग्रासले असून शहरातील सर्वच हाॅस्पीटल मध्ये डेंगूचे रूग्ण उपचार घेताना दिसत आहेत. सांगली व मिरज येथील खासगी रुग्णालयात जतमधील डेंगूचे रूग्ण उपचार घेत आहेत. या साथीने उग्र रूप धारण केले असून जत नगरपरिषदेने व आरोग्य विभागाने ही साथ ताबडतोब आटोक्यात आणण्यासाठी जत शहरात डेंगूच्या आजाराविषयी जनजागृती करावी व शहरातील सर्वच प्रभागामध्ये डासनिर्मूलनासाठी धुर फवारणी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment