जत,(प्रतिनिधी)-
कुत्र्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेतर्फे कुत्र्यांची नसबंदी मोहीम आजपावेतो राबवली गेली नसल्याने जत शहरातल्या भागाभागात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांना पकडण्याच्या डॉग वाहनांची व्यवस्था करण्यात यावी व नसबंदी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातल्या गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू आहे. पण प्रमुख रस्ते, बाजार पेठेतूनही आता कुत्र्यांचे कळपच्या कळप फिरतांना दिसत आहेत. शहरातील कोणताही भाग मोकाट कुत्र्यांवाचून मोकळा राहिलेला नाही. भटक्या कुत्र्यांची उत्पत्ती रोखण्यास कुत्री पकडून नसबंदी करण्याची मोहीम राबवण्याची मागणी होत आहे,पण पालिका त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. कुत्र्याची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
कुत्र्याचे हे कळप येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करतात. जखमी होणाऱयांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. संभाजी चौक, शिवाजी पुतळा चौक, महाराणा प्रताप चौक, तहसील कार्यालय आवार, लोखंडी पूल परिसर या भागात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment