Wednesday, October 30, 2019

विद्यार्थ्यांना देण्यात येणारी अंडी,दूध,फळे बंद

जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेला दूध,अंडी,फळे यांचा पूरक आहार ऑक्टोबर पासून बंद करण्यात आला आहे. असा आदेश शालेय शिक्षण व महसूल विभागाकडून काढण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त व टंचाईग्रस्त भागातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना जून 2019 पासून शालेय पोषण आहार अंतर्गत दूध,अंडी, फळे असा पूरक आहार  आठवड्यातून तीन दिवस देण्याचा निर्णय झाला होता,त्यानुसार जूनपासून राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक उपलब्धतेनुसार पूरक आहार दिला जात होता.
आता हा पूरक आहार बंद करण्यात आला आहे. यापुढे टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ ग्रस्त गावे शासनाकडून जाहीर झाल्यास पुन्हा पूरक आहार सुरू करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता दिला जात असलेला पूरक आहार बंद करण्यात येणार आहे. शाळा दिवाळी सुट्टीनंतर 10 नोव्हेंबर नंतर सुरू होणार आहेत, तेव्हा आता विद्यार्थ्यांना अंडी,दूध आणि फळांचा पूरक आहार मिळणार नाही.
पूरक आहार पुरवल्याचे बील नाही
दरम्यान, जून 2019 पासून राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या  पाच महिन्याच्या पूरक आहाराचे बील संबंधीत शाळांना व बचत गटांना देण्यात आलेले नाही. यामुळे वास्तविक बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही बिले तात्काळ देण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment