Tuesday, October 29, 2019

वातावरण बदलाचा आरोग्यावर दुष्परिणाम

घरोघरी वाढला ताप, खोकला;डेंगूचे रुग्ण वाढले
जत,(प्रतिनिधी)-
दरवर्षीप्रमाणे पावसाचा लहरीपणा यावर्षीही कायम होता. पावसाच्या बेभरोश्याच्या वागण्यामुळे शेतमालाच्या पिकांसह मानवाच्या आरोग्य विषयक अडचणी वाढविल्या आहेत. हल्ली सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आरोग्य विषयक समस्या जाणवत असून हा पाऊस आता आरोग्याला घातक ठरत आहे. वातावरणातील हा बदल अनेक आजरांना आमंत्रण देत असून ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले या वातावरण बदलाच्या समस्येत सापडले आहेत.

जतला उन्हाळा हा कडकच असतो. यावर्षी देखील कडक उन्हाने सर्वांची परीक्षा घेतली. पारा 43 अंशापर्यंत पोहचला. यानंतर, पावसाची वाट बघितली जात होती. परंतु, पावसाळा लांबल्याने जतकरांना कडक उन्हाचा चटका सोसावा लागला. यानंतर, तुरळक आलेल्या पावसामुळे जमिनीतला उष्मा वाढला. अशातच हैराण जतकरांचे चांगलेच हालहाल झाले. शेतमालाच्या पेरण्या देखील खोळंबल्या. यानंतर पावसाने दमदार एन्ट्री केली. परंतु, काहीच दिवसांनतर पावसाने दडी मारली. जुलै, ऑगस्टमध्ये हवा तसा पाऊस झाला नाही. सप्टेंबरमध्ये पुन्हा पावसाच्या सरी बसरल्या. पावसाचा लहरीपणाचा खेळ सुरूच होता. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने थैमान माजविले असताना, जतलासुद्धा  जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसानेही सर्वत्र परीक्षाच पाहीली. आता दिवाळीलाही पावसाने हजेरी लावत आरोग्य विषयक समस्या वाढविल्या आहेत. फटाक्यांच्या धुरातून सल्फरडाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड आणि फॉस्फरस वातावरणात पसरतो. या शिवाय विविध घातक रसायनही हवेत मिसळतात. यामुळे प्रदूषणात वाढ होते. सध्या फुटत असलेले फटाके व वातावरणात बदल झाल्याने श्‍वसन विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. फटाक्यांच्या धुराचा सर्वाधिक त्रास हा अस्थामाच्या रुग्णांसोबतच लहान मुले व वृद्धांना होतो. फटाक्याच्या धुराने दम लागणे, छातीत टोचणे, घशात सूज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका, जीव घाबरणे, अँलर्जिक खोकला, छातीत खरखर होणे यासारख्या विकारांना अनेकांना सामोरे जावे लागते आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने आणखीच जोर धरला आहे. क्यार वादळाचा हा फटका समजल्या जात आहे. या पावसामुळे वातावरणात गारठा वाढला आहे. यामुळे संसर्ग आजार असलेल्या तर डेंग्यूच्या डासांना पोषक वातावरण ठरत आहे. या वातावरणाला ज्येष्ठांसह लहानगे सुद्धा बळी पडत आहे. व्हायरलची सर्वत्र साथ आहे. ज्येष्ठ आणि लहान मुलांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्यांच्यात जंतुसंसर्गाची जोखीम वाढण्यासाठी वातावरण कारणीभूत ठरत आहे. याकरिता ज्येष्ठांना लसीकरणाचाही पर्याय हा महत्त्वाचा आहे. वातावरणातील बदल हा आरोग्य बिघाडास कारणीभूत ठरु शकतो याकरिता आरोग्याची काळजी घेण्याचे वैद्यकीयांकडून सांगितले जात आहे.
परतीचा पाऊस चांगलाच बरसत असल्यामुळे आणि दरम्यान, दिवाळीच्या फटाक्यांच्या झालेल्या प्रदूषणामुळे हल्लीचे वातावरण आरोग्यास हानीकारक आहे. ताप, खोकला, सर्दी आदीच्या समस्या घरोघरी जाणवत आहेत. दवाखाण्यात देखील गर्दी वाढली आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्‍वसनाचे आजारही जाणवत आहेत. शहरातील अनेक परिसरात डासांचा उच्छाद वाढल्याने डेंग्यूच्या तक्रारीही पुढे येत आहेत.
तेलकट पदार्थ खाणे टाळा
फटाक्यांच्या घातक धुरांचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेकवेळा कायमस्वरुपी श्‍वसनाचा आजार जडण्याची शक्यता असून काही प्रकरणात फटाक्यांच्या धुरामुळे अस्थम्याचा अटॅक येण्याचा धोका संभवतो. अस्थमाच्या किंवा श्‍वसनाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी फटाक्यांपासून दूर रहावे. घराच्या दारे-खिडक्या बंद ठेवाव्यात. आजार वाढल्यास किंवा अटॅक आल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे. या शिवाय, तेलकट फराळ खाऊ नये, असा सल्लाही वैद्यकीयांनी दिला आहे.लोकशाही

   

No comments:

Post a Comment