जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने द्राक्ष बागांमध्ये दावण्या रोगाने मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्याने द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. तालुक्यात अलीकडच्या काही वर्षांत द्राक्ष बागायत शेती वाढत आहे. याचा फटका उत्पादन नावर होणार आहे.चालू वर्षी प्रचंड उन्हाचा तडाखा व चांगल्या पद्धतीचा पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे द्राक्ष बागेची काळजी घेत चांगली काडी तयार करून वेळेत फळ धारणा घेण्याचे नियोजन केले होते. वेळेत छाटणी झाली होती. दुष्काळी भागात परतीचा पाऊस असला तरी जोराचा नसल्याचा अनुभव असल्याने शेतकरी द्राक्ष बागेकडे वळला आहे. त्यामुळे लागवड क्षेत्र वाढले आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस या भागातील शेतकरी जत तालुक्यात शेती घेऊन द्राक्ष पीक घेत आहेत.
या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला आहे. सुरुवातीला नसला तरी नंतर पावसाने दमदार हजेरी लावली.
ओढ्याला,विहिरींना आणि कुपनलिकांना पाणी आले आहे. सध्याही पाऊस सुरूच असल्याने मार्केटच्या द्राक्ष बरोबरच बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा द्राक्ष पिकवणे अवघड झाले आहे. सध्या मार्केटिंगच्या बागा तीन ते चार महिन्याच्या स्टेजला आहेत. या परतीच्या पावसामुळे अनेक बागा दावण्या रोगाने बाधित झाल्या आहेत.
बेदाणा उत्पादन घेण्यासाठी सप्टेंबर लास्ट व ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला छाटणी घेतली आहे. छाटणीनंतरसुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. द्राक्ष उत्पादक द्राक्ष बागेला छाटणीनंतर चार ते पाच महिन्यापर्यंत पोटाच्या पोराप्रमाणे जपतो. त्याच्या कुटूंबाचे शिक्षण ,कौटुंबिक खर्च व द्राक्ष बाहेरचा खर्च यासाठी द्राक्ष बागेवरच अवलंबून असतो.
सध्या अनेक द्राक्ष बागा 10 ते 13 दिवसांमध्ये पोंगा स्टेजला आहेत. म्हणजेच घड दिसण्याची अवस्था तसेच अनेक बागा छाटणीनंतर 32 ते 40 दिवसात प्लॉवरिंग या स्टेजमध्ये आहेत. म्हणजेच मणी सेट होण्याच्या प्रक्रियेत आहेत. या दोन्ही प्रक्रिया म्हणजेच द्राक्ष बागांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे लागते. या वेळेत पाऊस अजिबात नसतो. पण सध्या द्राक्ष उत्पादक पट्ट्यातील हजारो एकरातील बागा पोंगा व फ्लावरिंग या स्टेजमध्ये आहेत. पावसाने सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये जोरदार हजेरी लावली आहे.
गेल्या काही दिवसांत पावसाने चांगली हजेरी लावल्याने दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोजच औषध फवारणी करावी लागत आहे. औषध फवारणी केल्यावर किमान दोन चार दिवस पाऊस व्हायला नको असतो. पण हमखास या काळात पाऊस व्हायला लागला आहे. त्यामुळे औषधाची मात्रा काम करीत नाही. औषध फवारणी केल्यानंतर चार तास त्यांना निगराणी खाली ठेवावी लागते. मात्र सतत पाऊस होत असल्याने त्याचा फटका बसत आहे.
No comments:
Post a Comment