मागच्या चार विधानसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्या महिला उमेदवारांची संख्या वाढत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ३,२३७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात २३५ म्हणजे फक्त ७.३ टक्के महिला उमेदवार आहेत. महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात १५२ मतदारसंघातून महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५0 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. पण हे आरक्षण विधानसभा निवडणुकीला लागू होत नाही. पुरुष उमेदवारांच्या तुलनेत महिला उमेदवारांचे प्रमाण पाहिले तर हा आकडा उत्साहवर्धक वाटणार नाही. १९७२ साली एकूण ५६ महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. पण एकाही महिला उमेदवाराला विजय मिळवता आला नव्हता. पण आता परिस्थिती बदलतेय. विविध राजकीय पक्षातील महिला महापालिकेत, विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी तिकीटाची मागणी करत आहेत. यावेळी राजकीय कुटुंबातील महिलांना मोठया प्रमाणावर उमेदवादी देण्यात आली आहे.
स्थानिक महिलांना कमी प्रमाणात तिकीटे मिळाली आहेत असे भाजपामधील एका महिला नेत्याने सांगितले. महाराष्ट्रात ८.९७ कोटी मतदार असून त्यात ४.३८ कोटी महिला मतदार आहेत. मुंबईत महिला मतदारांची संख्या लक्षणीय असली तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेतील त्यांचा सहभाग खूपच कमी आहे.
मुंबईत विधानसभेच्या ३६ जागांसाठी एकूण ३३४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या फक्त ३१ आहे. हे प्रमाण ९.३ टक्के आहे. ३६ पैकी २१ मतदारसंघातून महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी मुंबईत फक्त तीन महिलांना उमेदवारी दिली आहे. युतीमुळे भाजपाच्या वाटयाला १७ जागा आल्या असून त्यांनी मनिषा चौधरी, भारती लव्हेकर आणि विद्या ठाकूर या तीन विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मनिषा चौधरी दहीसर, भारती लव्हेकर वसोर्वा आणि विद्या ठाकूर गोरेगावमधून निवडणूक लढवत आहेत.
मुंबईत काँग्रेस २९ जागा लढवत असून त्यांनी फक्त तीन जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. धारावीमधून विद्यमान आमदार वर्षा गायकवाड, घाटकोपर पूर्वेमधून मनिषा सुर्यवंशी आणि कांदीवली पूर्वेमधून डॉ. अजंता यादव यांना उमेदवारी दिलीय. शिवेसना १९ जागा लढवत असून त्यांनी फक्त यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहा जागा लढवत असून त्यांनी दिंडोशीमधून विद्या चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.
No comments:
Post a Comment