32 उमेदवार पडले
जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील 288 मतदारसंघापैकी 32 जागांवर वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले असले तरी 32 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.
अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती. लोकसभेत सोबत असलेला खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबतही आंबेडकर यांनी ऐनवेळी युती तोडली. त्यामुळे राज्यातील 288 मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. भाजपची बी टीम असल्याचा वंचितवर आधीपासूनच आरोप केला जात आहे. परंतु, हा आरोप वंचितच्या नेत्यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीसोबत वंचितची आघाडी झाली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळे दिसले असते असे निवडणूक निकालावरून आता स्पष्ट झाले आहे.
राज्यातील जवळपास 32 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी 5 ते 10 हजार मतांच्या फरकाने पडले आहेत, तर त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी 10 हजारांहून अधिक मते घेतली आहेत. वंचितला मिळणारी ही सर्व मते काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणारी मते असल्याचे बोलले जात आहे. वंचितने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केली असती तर राज्यात आघाडीला सव्वाशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, हे आता निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment