Tuesday, December 31, 2019

रांगड्या तमाशाची कसदार भूमी


सांगली संस्थानचे श्रीमंत अप्पासाहेब ऊर्फ चिंतामणराव पटवर्धनांच्या दरबारी अनेकजण आपली कला सादर करीत होते. नायकिणीची गाणी, राधेचा नाच, गोवेकरणीची गाणी आणि विशेष म्हणजे तमाशा लावण्याचे फड त्यामध्ये असत. राधा रणमल्ली, इमाम, आवडी, चिमणी, बक्षीची ,रमा, गुलाबी, वीणा, नायकिणी, फकिरा अशा अनेक हरहुन्नरी नर्तिका दरबारी येऊन आपली अस्सल कला सादर करून जात. सांगली जिल्ह्यातील तमाशा परंपरा 18 व्या शतकापासून ते आजतागायत जिवंत आहे. पूर्वी 1918 मध्ये शेटफळे (ता. आटपाडी0 येथील हौशी तमाशा कलावंत वामन लांडगे यांनी बाबू गहिना लोकनाट्य तमाशा मंडळाची मूहुर्तमेढ रोवली. त्यानंतर तमाशा कलेला नवे बळ मिळत गेले.नंतर 1920 मध्ये बनपुरी (ता. आटपाडी) चा रांगडे तमाशा कलावंत म्हणजे आवजी कृष्ण अहिवळे यांनी तमाशा सुरू केला.
1935 मध्ये गोमेवाडीच्या नाना वामन सोहनी यांनी लोकनाट्य तमाशा मंडळाची हालगी वाजवली. या कालखंडात छेळबराव मैना हा वग खूपच गाजला होता. याच कालखंडात जो तमाशा गाजला तो शाहीर पठ्ठे बापूराव ऊर्फ श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी यांचा.
ते मूळचे रेठरे हरणाक्षचे. जातीने ब्राम्हण असूनही त्यांनी तमाशाचा डफ वाजवला. आपल्या अस्सल प्रतिभेतून निर्मान-लिहिलेली गळगौळण, लावणी, वग यांमुळे तर अखंड महाराष्ट्र वेडाच झाला. त्यांनी अखंड महाराष्ट्रात तमाशाची कला दाखवून सांगली जिल्ह्याचे नाव अजरामर केले. त्यांचा कालखंड होता 11 ऑक्टोबर 1866 ते 22 डिसेंबर 1945. ते पट्टीचे गायक आणि अभिनेते होते. त्यांच्या या पट्टीतल्या गाण्याने लोक त्यांना शाब्बास रे पठ्ठ्याऽऽ असे बोलवू लागले. त्याच दिवसापासून पठ्ठे बापूराव हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले.
तमाशा या कलेला हिणवणार्यांचे डोके ताळ्यावर आणणारे आणि तमाशाचे रुपांतर लोकनाट्यात करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. त्यांनी आपल्या तमाशाला लोकनाट्य हे नाव दिले. पुढे लोकनाट्यास चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेकांनी रंगभूमीवर आणले. पण अण्णा भांसारखी कला कोणालाही जमली नाही. अण्णा भाऊंच्या तमाशात महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयाला भिडणारे आणि त्यांची घट्ट पकड घेणारे असे अप्रतिम गुण होते. त्यांच्या लोकनाट्यात शृंगार आणि नृत्यप्रधानता पूर्णपणी नाकारली. त्यांच्या तमाशात सोंग़ाड्याऐवजी धोंड्या हे पात्र तयार झाले. आण्णा भाऊंच्या लोकनाट्यात राधा-कृष्णाच्या प्रेमावर आधारलेल्या उत्तान शृंगाराच्या लावण्यांना त्यांनी पूर्णपणे फाटा दिला. नव्या लोकनाट्याला जन्म देताना सार्या जनतेला बायका मुलांसह सर्वांना पाहता यावा, असा नवा साज लोकनाट्यात त्यांनी चधवला.
ॠांगली जिल्ह्यातील काळू-बाळूने आपली तमाशाची कला गल्ली ते दिल्ली आणि सातासमुद्राच्या पलिकडे पोचवली. जिल्ह्यातील कवलापूर गावात काळू-बाळू ही बंधुप्रेमाची विनोदी जोडगोळी जन्मास आली. हे पिढीजात तमासगीर. त्यांचे आजोबा सातू यांनी या कलेची मूहुर्तमेढ रोवली. त्यांचे मित्र हिरोजी होते. या दोन सच्चा मित्रांनी सातू-हिरू तमाशा मंडळ कवलापूर असे नामकरण करून कला जपली. सातूंनी शिवा-संभा तमाशा मंडख कवलाकरपूर स्थापन केले व कवलापूरची कला संपूर्ण महाराष्ट्रभर गाजविली.
खाडे यांची तिसरी पिढी म्हणजे काळू-बाळू ऊर्फ लहू व अंकुश खाडे. त्यांचा जन्म सन 1933 मध्ये झाला. त्यांचे पिढीजात तमाशाच्या घराण्यात. मात्र खडतर बालपण गेले. अवघ्या चार मिनिटांच्या फरकाने जन्मास आलेली विनोदी जोडगोळी. त्यांचे शिक्षणात मन रमत नसे. ते दोघे शाळेत गेले की, मास्तर त्यांना लावण्या म्हणायला लावायचे. त्यांनी चौथीपर्यंतच शिक्षण घेतले. नंतर त्यास त्यांनी रामराम ठोकून तमाशाच्या फडात इंट्री केली. लहानपणापासूनच त्यांना विनोद आणि नाटकाची आवड होती. त्यामुळे आपल्या घराण्यातल्या तमाशात ते छोटी-मोठी पात्रे करू लागले. बघता बघता अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. तमाशाची रांगडी कला गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि त्याहूनही सातासमुद्राच्या पलिकडे पोचवली.
1963 मध्ये औरंगाबादेत तमाशास चांगली बिदागी मिळाली. 11 हजार प्रेक्षकांनी त्यांच्या विनोदी शैलीला टाळ्यांनी दाद दिली. त्यांच्या तमाशातून गाजलेले वगनाट्य म्हणजे जहरी प्याला. प्रेमाची फाशी, चंद्र हाच राजपुत्र, पतिव्रतेचा पोलादी किल्ला, विक्रम-शशीकला, राजा हरिश्चंद्र, महिंदाची नगरी , इश्क पाखरू, दगाबाज मित्र इत्यादी अप्रतिम वगनाट्यातून आपल्या तमाशाची ख्याती मिळवली. काळू-बाळू या जोडगोळीने मराठी माणसाच्या मनावर 50 वर्षे अधिराज्य केले. या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश..
जिल्ह्यातील तमाशांची घराणी
1)   सातू-हिरू-कवलापूरकर 2) पठ्ठे बापूराव-रेठरे हरणाक्ष 3)सुबराव-कवलापूरकर4) काळू-बाळू-कवलापूरकर 5)उमा बाबाजी सावळजकर 6) उमा बाबा-पेडकर7) शिवा-सम्भा-कवलापूरकर 8)कृष्णा मास्तर- ऐतवडेकर 9) शंकर फक्कड 10) उस्ताद सावळा सावंत- पारेकर 11) शेकू शिवा-घाटनांद्रेकर 12) शंकरराव खिलारे-तिसंगीकर 13)दत्तोबा खिलारे-तिसंगीकर 14) शंकर ढालेवाडीकर 15) शिवा तासगावकर 16) गुलाब तासगावकर 17) बाबूराव कूपवाडकर 18) नायकू कामेरीकर 19) जयवंत सावळजकर 20) गणपतराव व्ही माने (चिंचणीकर) 21) रामू भीमू शामू-कवलापूरकर 22) बापू शिरढोणकर 23) आवजी कृष्णा (बनपुरीकर) 24) बबन लोंढे (हिंगणगावकर) 25) आगर वाघमारे (नागजकर) 26) सुखदेव लोंढे (हिङणगावकर) 27) गुलाबराव ढालेवाडीकर 28) शामराव पाचेगावकर 29) नामदेव इऱळीकर 30) रामचंद्र लोंढे (दहिवडी) 31) दादू लोंढे (पळशी) 32) प्रभाकर शिंदे वाडीकर 33) शाहीर राजा पाटील (कवलापूरकर)-प्रा. आबासाहेब शिंदे



No comments:

Post a Comment