Tuesday, December 24, 2019

सव्वा वर्षात सात राज्यांतून भाजप हद्दपार

झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी ४१ चा जादुई बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. अंतिम निकाल जर असाच राहिला, तर महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही भाजप सत्तेबाहेर फेकला जाईल. मार्च २0१८ मध्ये, भाजप किंवा त्यांचे सहयोगी पक्षांचे २१ राज्यांत सरकार होते. परंतु डिसेंबर २0१९ पयर्ंत ही आकडेवारी १५ राज्यांपयर्ंत घसरली आहे. गेल्या एका वर्षात चार राज्यात भाजपचा पराभव झाला असून झारखंड पाचवे राज्य बनण्याच्या दिशेने जात आहे.

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने जोरदार विजय मिळविला आणि केंद्रात स्पष्ट बहुमताने सत्ता मिळविली. यानंतर भाजपने एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकल्या. २0१४ मध्ये भाजपप्रणित एनडीएचे केवळ सात राज्यात सरकार होते. येथून भाजपची राज्ये पादाक्रांत करण्याची स्पर्धा सुरु झाली. एकापाठोपाठ एक भाजपने राज्ये जिंकली. त्यावर्षी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाने विजय मिळविला. २0१७ मध्ये उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठय़ा राज्यातील विजय हा राजकीय दृष्टीने शानदार विजय होता. २0१८ पयर्ंत २१ राज्यांनी भगवा फडकला होता. या राज्यांमध्ये एकतर भाजपचे किंवा युतीचे सरकार होते.
मार्च २0१८ मध्ये, जेथे भाजप २१ राज्यांमध्ये सत्तेत होता. मात्र, काळ सरत गेला तसतसे चित्र बदलत गेले. २0१८ च्या उत्तरार्धात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान यासारख्या मोठय़ा राज्यांत भाजप सत्तेबाहेर फेकला गेला. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जवळपास दीड दशके या पक्षाची मक्तेदारी होती. २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चमकदार कामगिरी बजावत पूर्वीपेक्षा आणखी मोठा विजय मिळविला आणि ३0३ जागा जिंकल्या.
केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारची स्थापना झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकांचे निकाल आले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले पण मुख्यमंत्रिपदावरून असा गोंधळ उडाला की, राज्यात भाजपचा पराभव झाला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले.
त्यामुळे आता देशातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ३३ टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उतरली आहे. २0१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती. भाजपने मिझोरमसारख्या राज्यातही विजय मिळवत सत्ता स्थापन केली. दुसरीकडे बालेकिल्ला मानली जाणारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमधील सत्ता भाजपाने गमावली.
आंध्र प्रदेशमध्येही तेलगू देसम पार्टीने भाजपपासून फारकत घेत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जम्मू-काश्मीरमध्येही डिसेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने तेथेही भाजपा आणि पीडीपीचे सरकार बरखास्त झाले. तथापि, हरियाणामध्ये भाजपाने जेजेपीशी हातमिळवणी करून सत्ता कायम राखली. आता २0१९ पार होत असताना झारखंडही भाजपच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे.

No comments:

Post a Comment