देशभरातील दहा ते १७ वयोगटातील सुमारे ४0 लाख मुले अंमली पदार्थांचे सेवन करतात, तर ३0 लाख मुलांना दारूचे व्यसन जडले आहे, अशी माहिती सरकारतर्फे लोकसभेत देण्यात आली.सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रतनलाल कटारिया यांनी प्रश्नाचे लेखी उत्तर देताना वरील माहिती दिली. २0१८ च्या राष्ट्रीय सर्वेक्षणातील माहितीनुसार, या वयोगटातील सुमारे ३0 लाख मुले व्यसनासाठी 'इनहेलर'चा वापर करतात. २0 लाख मुले भांग आणि वेदनाशामक औषधांचे व्यसन करतात, तर चार लाख मुले अँम्फेटामाइन-टाइप स्टिम्युलन्ट (एटीएस) म्हणजेच विशिष्ट प्रकारची उत्तेजके वापरतात आणि दोन लाख मुले कोकेन आणि ग्लानी आणणारी औषधे घेतात, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रौढांमध्ये (१८ ते ७५ वयोगट) १५ कोटी १0 लाख व्यक्ती मद्यसेवन करतात, २ कोटी ९0 लाख भांग घेतात, १.९0 लाख इतर अमली पदार्थांचे सेवन करतात; तर १ कोटी १0 लाख व्यक्ती वेदनाशामक औषधांचे व्यसन करतात, ६0 लाख व्यक्तींना इनहेलरचे व्यसन आहे, २0 लाख व्यक्ती 'एटीएस' उत्तेजके आणि ग्लानी निर्माण करणारी औषधे वापरतात; तर १0 लाख व्यक्ती कोकेनचा वापर करतात, अशी माहितीही या वेळी लोकसभेत देण्यात आली.
राज्यांनुसार, या व्यसनांमध्ये आणि त्यांच्या साधनांमध्ये बदल दिसतो. मंत्रालयाकडून व्यसनाधीनतेचे प्रमाण घटविण्यासाठी 'एनएपीडीडीआर' हा राष्ट्रीय कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. हा आराखडा २0१८-२0२५ या कालावधीसाठी असून विविध स्तरांतून राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जागृतीपर कार्यक्रम राबविणे, पालकांसह सेमिनार आयोजित करणे, किशोरवयीन मुले आणि तरुणांसाठी संवादात्मक कार्यक्रम, उपचार सुविधा इत्यादी उपययोजना करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment