Thursday, December 19, 2019

भक्तांना आईची माया देणारी 'श्री यल्लमा देवी'


रेणुका अर्थातच यल्लमा देवीचे प्रस्थ महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या तीन राज्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात आहे. या भागात गावोगावी यल्लमा देवीची मंदिरे आहेत आणि साधारण मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभापासून या देवीच्या यात्रांना प्रारंभ होतो. सर्वात मोठी यात्रा जत (महाराष्ट्र) आणि कोकटणूर ( कर्नाटक) आणि सौंदत्ती (कर्नाटक) याठिकाणी भरते. इथे लाखो भाविक देवीच्या दर्शनाला आणि नवस फेडायला येत असतात.  या देवीला  मुली सोडण्याचा प्रघात होता. मात्र शासन आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ही कुप्रथा बंद झाली आहे. मात्र चोरीच्या मार्गाने मुलींची देवीशी लग्न लावून दिले जात असल्याचे म्हटले जात असले तरी याबाबत ठोस काही सांगता येत नाही. ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला 'यल्लमा', "संपूर्ण जगाची आई" किंवा "जगदंबा" मानतात.
या देवीची आख्यायिका सांगितली जाते. यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते.

रेणुका ही इक्ष्वाकु वंशातील रेणु (प्रसेनजित) नावाच्या राजाची कन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्‍नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते त्यांतला एक परशुराम होता. शिवाची पत्नी पार्वती ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूर चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येउन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.
रेणुकामातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणु राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लाघवी होती. वयाच्या आठव्या वर्षी अगस्ती ऋषींनी रेणु राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नींबरोबर करण्याचे सुचवले. जमदग्नी हे रुचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते; खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका जमदग्नी मुनींना पूजाअर्चेत मदत करत असे.
रेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि जमदग्नींसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वाटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती घरी जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. (रेणुका शब्दाचा संस्कृत अर्थ वाळूचे अत्यंत लहान कण असा आहे.)
एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप केला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्याहाती जेव्हा आश्रमात परत आली, तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले.
पतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली, आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली, तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले. त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदुळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही; लौकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे, असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल, तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील, असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली.
रेणुका देवींना पाच पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमण्वत्‌(बृहत्भानु/मरुत्वत्‌), सुषेण(बृहत्कर्मन्‌) आणि रंभद्रा. रंभद्रा हा सर्वात कनिष्ट आणि सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रंभद्रा हाच परशुराम म्हणून ओळखला जातो.
जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या, तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता, त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला, आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला एक वर दिला. परशुरामाने लगेच आपल्या आई आणि भावांचे प्राण परत मागितले. रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली, शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले.
एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेला तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्निंच्या आशिर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमदग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात येल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment