Saturday, December 21, 2019

दगडी पाटा, वरवंट्याने घेतली अडगळीची जागा

जत,(प्रतिनिधी)-
 स्वयंपाक म्हटला की वाटप आलेच आणि हे वाटप दगडी पाटा, वरवंट्यांवरील असेल, तर जेवणाचा स्वादच वेगळा असतो. मात्र, आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असणारे चूल, दगडी जाते, पाटे-बरवंटे या वस्तूंची जागा आता अनुक्रमे गॅस, पीठ गिरणी व मिक्सरने घेतली आहे. त्यामुळे या वस्तू अडगळीत पडल्या आहेत.

पूर्वी प्रत्येक घराच्या बाहेर वाटण व इतर पदार्थ बाटण्यासाठी पाट्याचा व वरवंट्याचा उपयोग केला जात असे. त्या पदार्थाला एक वेगळीच चव निर्माण होत असे. वाटण वाटून झाले, की पाटा व वरवंटा घरच्या बाहेर अंगणात उभा करून ठेवला जायचा, घरच्या जेवणात वाटण हे नेहमीच लागते. त्यामुळे दररोज पाटा, वरवंटा वापरात असायचा. रोजच्या वापरामुळे त्याची टाकी झिजून जायची. अशा वेळी घरातील पाटा-वरवंट्याला टाकी लावून घ्यायची असेल, तर घरातील गृहिणी टाकी लावणाऱ्या बाईला बोलवत. तिच्याकडे घरातील पाटा-वरवंटा टाकी लावण्यासाठी सुपूर्द केल्या जायचा. कुटण्यासाठी खलबत्ता उपयोगी पडत असला, तरी त्यात फक्त कोरडे पदार्थ बनवणे शक्य होत असते. परंतु, पदार्थाला ओलसरपणा असण्याची गरज असेल, तर त्यासाठी मात्र पाटा-वरवंटा वापरण्याशिवाय पर्याय नसे.
साधारण, दोन ते तीन इंच जाडीचा काळ्या दगडापासून पंचकोनी आकारात पाटा बनविण्यात येतो. हा पंचकोनी असला तरी त्याचा साधारण आकार पोस्टाच्या उघड्या पाकिटासारखा असतो. म्हणजे समान लांबीच्या दोन समांतर बाजू, एक बाजू त्यापेक्षा कमी लांबीची आणि वरच्या दोन बाजू वर निमुळत्या होत एका ठिकाणी मिळालेल्या असा असतो. जमिनीपासून थोडा वर राहावा, म्हणून त्याच्या एका बाजूला त्याच दगडातून कोरून एक सपाट उंचवटा तयार केलेला असतो. म्हणजे जमिनीवर तो आडवा टाकला की. वाटणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर बाटण करणे, सोपे जाते. याबरोबरच वरवंटा असल्याशिवाय हा संच पूर्ण होत नाही.
वरवंटादेखील काळ्या दगडापासून बनवलेला असतो. वरवंटयाची लांबी अन् जाडी पाट्याच्या आकाराला योग्य अशा प्रमाणात असते. दंडगोलाकृती काळ्या दगडापासून बनवलेल्या वरवंटाच्या दोन्ही बाजू मधल्या बाजूपेक्षा कमी जाडीच्या आणि किंचित उतरत्या स्वरूपात असतात. ज्या पदार्थाचे बाटण करायचे असते, तो पदार्थ पाटा आणि वरवंट्यांमध्ये घर्षण करत मध्ये-मध्ये आवश्यक तितके पाणी वापरून त्याचा एकसंध ओला गोळा तयार करता येतो. हे वाटण करताना वाटणाऱ्याला पदार्थ किती बारीक झाला आहे. याचा वारंवार अंदाज घेता येतो. त्यामुळे पदार्थ जितका बारीक करणे आवश्यक आहे, तितकाच तो करणे शक्य होते. मिक्सर ग्राइंडरमध्ये ते शक्य होत नाही.
यात घर्षणाने अधिक उष्णता निर्माण होत नसल्यामुळे पदार्थाची मूळ चव कमी न होता उलटपक्षी अधिक चवदार वस्तू बनते. पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुका नारळ घालून केलेली चटणी किंवा वाटली डाळ, आंबे डाळ, इडली-वड्यासारखे दक्षिणी पदार्थ, मांसाहार, मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो. त्यासाठी पाटा- वरवंटा नेहमी वापरला जायचा. पाटा- वरवंट्यामुळे महिलांमध्ये असणारा कणखरपणा मिक्सरमुळे कमी झाला आहे.
याबरोबरच खाण्यातील सकसपणाही कालबाहा झाला आहे. त्यासोबत शरीरस्वास्थ्यही लयाला गेल्याचे पाहायला मिळते. पाटा, वरवंटा काही वर्षांपूर्वी सर्वत्र वापरात होता. त्यातून बाटलेल्या पदार्थाला चव वेगळीच जाणवत असायची. जी आज दुर्मिळ झालेली आहे.
पाटा, वरवंटा आता शोभेच्या वस्तू!
सद्य:स्थितीत प्रत्येक घराबाहेर व रोज वापरात असणारा पाटा, वरवंटा; तसेच कुटण्यासाठी लागणारा खलबत्ता सर्वत्र आधुनिक स्वयंपाक घरांतून आता अदृश्य झाला आहे. त्याऐवजी विजेवर चालणारा मिक्सर प्रत्येकाच्या घरामध्ये आला आहे. इतर काही वस्तूंबरोबरच पाटा-वरवंटा आता इतिहासजमा होणार, असे म्हणायला हरकत नाही. काही घरात तो पाहायला मिळतो. मात्र, तोही फक्त अडगळीत, संग्रहालयात किंवा शोभेची वस्तू म्हणून ठेवलेला आढळतो.

No comments:

Post a Comment