जगातील महानतम गणितज्ज्ञांमध्ये गणले जाणारे, महान भौतिकी अल्बर्ट आइन्सटाईन यांच्या तोडीचे गणिताचे जादुगार श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिन आहे. शून्या च्या शोधाकडे भारतीयांचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणून पाहिले जाते. शून्याच्या शोधामुळे केवळ गणितक्षेत्रालाच नव्हे तर इतर सर्व क्षेत्रांना एक नवा आयाम मिळाला. एके काळी गणितात अग्रस्थानी असणार्या भारतात आज गणित एक कठीण आणि गंभीर विषय समजला जातो. महान भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख. तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम या छोट्याशा गावी काम करून जीवनचरितार्थ चालविणार्या सामान्य दाम्पत्याला ईश्वराने एक अलौकिक अपत्य दिले आणि २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणमजवळील इरोड या गावी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला.
कधी कधी निसर्ग एखादी अलौकिक रचना करतो. त्यासारखी कलाकृती पुन्हा मानवजन्मात आढळत नाही. रामानुजन यांची गणिती प्रतिभा प्राथमिक शाळेपासूनच थक्क करणारी होती. विलक्षण प्रतिभाशाली रामानुजन कधी कधी असे प्रश्न विचारत की, त्यांचे शिक्षकही कोड्यात पडत. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी जॉर्ज शुब्रिज कार यांचा विशुद्ध व उपयोजित गणितातील प्रारंभिक निष्कर्षांचा सारांश (सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड अप्लाइड मॅथेमॅटिक्स) हा ग्रंथ वाचून बीजगणित, ज्यामिती, त्रिकोणमिती आदीवरील सूत्रांची उत्तरे आपल्या उत्तराशी पडताळली. पुढे स्वत:ची प्रमेये विकसित करून ते शुब्रिज कार यांच्याही पुढे गेले.
रामानुजन यांनी आयुष्यभर अनेक संकटाना तोंड देत संशोधनकार्य सरू ठेवले होते. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. जगभरातील तमाम वैज्ञानिक आणि गणितज्ज्ञ आजही त्यांच्या सूत्रांचा आणि प्रमेयांचा गहन अभ्यास करीत आहेत. रामानुजन यांनी अल्पकाळात दिलेले योगदान आजदेखील संशोधकांना आवाहन असून आणखी काही शतके काम करता येईल एवढी त्यांची सूत्रे सखोल आहेत.
ब्रिटीश गणितज्ज्ञ प्रो. हार्डी यांच्या आग्रहाखातर इंग्लंड ला गेलेल्या रामानुजन यांनी तेथील चार वर्षाच्या वास्तव्यामध्ये अनेक महत्त्वाचे शोध निबंध प्रकाशित करून अल्पावधीमध्ये फेलो ऑफ रॉयल सोसायटी हा बहुमान मिळविला (१९१८). हा बहुमान मिळविणारे ते केवळ दुसरे भारतीय होत. इंग्लंडमधील कडाक्याची थंडी आणि त्यांचा शाकाहार यामुळे त्यांचे आरोग्य बिघडले. केवळ ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र, शांत आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांच्या प्रभावी संशोधनाने अंकशास्त्र, थिटा फंक्शन, अनंत मालिका, अचूक किंमती, घनांच्या रूपात संख्यालेखन, संख्यांचे विभाजन, त्रिकोणमिती अशा अनेक संकल्पनांना वेगळा आयाम मिळवून दिला. रामानुजन हे भारतीय प्रतिभेचे प्रतीक असून शिरोमणीही आहेत. ते त्यांच्या गणितीय प्रतिभा आणि कार्य कर्तृत्वाने अनंत काळापयर्ंत आपल्याला प्रेरणा देत राहतील. त्यांनी आर्थिक, शैक्षणिक आणि शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले. रामानुजन हा निसर्गाचा एक गणिती चमत्कार होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रामानुजन यांच्या जीवनावरील इंग्लिश बोलपट तीन वर्षापूर्वी अमेरिकेत प्रसारित झाला.
रामानुजनच्या मते प्रत्येक समीकरण ईश्वराशी निगडित असते, तर हार्डी पूर्ण नास्तिक. तथापि, दोघांची मतभिन्नता त्यांच्या बौद्धिक किंवा वैयक्तिक मैत्रीच्या आड येत नाही. मात्र पाच वर्षांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात शाकाहारी रामानुजन यांची खाण्यापिण्याची झालेली आबाळ, आई, मित्र, पत्नी यांचा वियोग, मितभाषी स्वभाव यांमुळे पोटात भूक, हृदयात प्रेम, बुद्धीत गणित आणि जीवनात निराशा यामुळे त्यांना क्षयाची सुरुवात झालेली असते. विकलांग अवस्थेत ते भारतात परततात आणि मद्रासमधील आरोग्यधामात दाखल होतात. इंग्लंडमधील टॅक्सीत बसण्याच्या वेळेस तिचा १७२९ हा नंबर दोन घनांची बेरीज असलेला सर्वांत लहान आकडा आहे हे रामानुजन दाखवून देतो. गणितातल्या अशा काही विक्षिप्त संख्यांना आजही रामानुजन संख्या असे संबोधले जाते.
आजही खरी मैत्री आणि खरा मित्र दुर्मीळ होत असताना व खर्या मित्राची व्याख्या करणे कठीण झाले असताना, एकदा रामानुजन यांना त्यांच्या मित्रांनी मैत्रीची व्याख्या विचारली असता, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मित्रता २२0 आणि २८४ या संख्यांप्रमाणे असावी हे सांगून २२0 ला भाग जाणार्या १, २, ४, ५, १0, ११, २0, २२, ४४, ५५, ११0 यांची बेरीज २८४ तर २८४ ला भाग जाणार्या १, २, ४, ७१, १४२ या संख्यांची बेरीज २२0 येते असे स्पष्टीकरण सुद्धा दिले. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण गणितातील मूलभूत तसेच उपयोजित संशोधन यासाठी त्यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून भारताची गणितातील गौरवशाली परंपरा वाढवूया.
No comments:
Post a Comment