जत,(प्रतिनिधी)
दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या आणि दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास सुरू झाला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिकत असलेल्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढत असल्याचे दिसून येत आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात मणक्याच्या आजाराला बळी तर पडावे लागणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. पाठय़ पुस्तका व्यतिरिक्त अन्य शैक्षणिक साहित्यांच्या भारामुळे दप्तराचे ओझे वाढत असल्याचे दिसत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अध्ययन करण्यासाठी पुस्तक व नोटबुक यांसह बर्यासच्या शालेय साहित्यांची गरज असते. हे सर्व साहित्य विद्यार्थी दप्तरात भरून दप्तर पाठीवर घेताच. वेळा पत्रकातील वाढलेल्या तासिकांमुळे पुस्तके व नोटबुक यांची संख्या वाढते. पूर्वी विद्यार्थी पुस्तके व नोटबुक हातात किंवा एखाद्या कापडी पिशवीत भरून ती पिशवी खाकेत नेत होते. मराठी शाळेत पाचवी ते दहावीला तीस दिवस आठ तासिका व दोन दिवस नऊ तासिका असतात. प्रत्येक तारखेला अध्ययनासाठी एक पाठय़पुस्तक एक नोटबुक विद्यार्थ्यांना शाळेत न्यावे लागते. तसेच कंपास पेटी गृहपाठाच्या वह्या व अन्य आवश्यक साहित्यही न्यावे लागते. अनेक विद्यार्थी सोबत पाण्याची बॉटल पण नेतात. परिणामी दप्तराचे वजन तीन किलोच्या पुढे जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील याबाबत चिंता व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांना भविष्यात पाठीच्या मणक्याचे आजार होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे शाळेत शालेय शिक्षण विभागाने 21 जुलै 2005 ला एक शासन निर्णय काढून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्के असावे, अशी सूचना सर्व शाळांना केली. मात्र, येथील तसेच परिसरातील शाळा दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी कोणतेही पावले उचलताना दिसत नाहीत.
दप्तराच्या कोपरा आवश्यक
दप्तराचा त्रास वाचवण्यासाठी शाळांनी वर्गखोलीत दप्तर कोपरा तयार करावा. अनावश्यक वह्या विद्यार्थ्यांना आणण्यास भाग पाडू नये. आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुचवले होते. शाळांनी याची अंमलबजावणी एक-दोन वर्ष केलीही परंतु, आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढल्याचे दिसून येते. इंग्रजी शाळा व सीबीएससी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी तर दप्तराचे अधिक ओझे सोसत असल्याचे दिसत आहे.वार्ताहर/धानला
No comments:
Post a Comment