Tuesday, December 17, 2019

फेसबुकवरील मित्रांना भेटायला गेली अन घरदार विसरली

सोशल मीडियाचा महत्त्वाचा हिस्सा म्हणून फेसबुककडे पाहिले जाते. ज्याद्वारे जुन्या मित्रांना शोधले जाते आणि नवीन मित्रही बनविले जातात. लहानापासून ते अगदी मोठय़ांची फेसबुक ही दिवसाची आवश्यकता झाली आहे. अशाच फेसबुकवर बनविलेल्या मित्रांना भेटण्याकरिता नवरा आणि चार वर्षाच्या मुलाला सोडून गेलेल्या बायकोला शोधून काढण्यात पोलिसांना चांगलाच कस लागला खरा, पण त्यामागील सत्य शोधले. तर, सोशल मीडियाचा वापर किती नुकसानकारक ठरू शकते, याचा विचार न केलेलाच बरा. घटना आहे वर्धा शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या बोरगाव (मेघे) येथील. तब्बल २४ दिवस मित्रांची भेट घेतलेल्या बायकोला नवर्‍याच्या स्वाधीन करण्यात वर्धा पोलिसांना यश आले.

एखाद्या चित्रपटाची कथा ठरेल, अशाच या कहाणीतील सत्यतेचा शोध वर्धा पोलिसांनी लावला. २0 नोव्हेंबरला वर्धा शहर पोलिस ठाण्यात पत्नी चांदणी (काल्पनिक नाव) हरविल्याची तक्रार पती आकाश (काल्पनिक नाव) याने नोंदविली होती. चार वर्षांचा मुलगा आणि पतीला सोडून पत्नी हरविली कशी असेल, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. यात पतीकडून पोलिसांनी घेतलेल्या माहितीत चांदणी दिवसभर मोबाईलवर असायची, असे स्पष्ट झाले. पोलिसांनी मोबाईलच्या आधारावर शोध घेत चांदणीला अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. यानंतर चांदणीने पोलिसांना दिलेले बयाण हे फारस विचारात टाकणारेच ठरले.
चांदणीने फेसबुकवर अनेकांना मित्र बनविले होते. एवढेच नव्हे तर तिने त्यांचे मोबाईल क्र मांकही स्वत:कडे मिळविले होते. पण, ते मित्र केवळ फेसबुकपर्यतच र्मयादित असतात की, त्यांची भेट घेतली जाऊ शकते, म्हणून सर्वप्रथम तिने २0 नोव्हेंबरला कारला रोड परिसरातील ३0 वर्षीय दुर्योधन (काल्पनिक नाव) याची वर्धा बसस्थानकावर भेटण्याकरिता बोलविले. फेसबुकचा मित्र मला प्रत्यक्षात भेटला, हेही तिला स्वप्न वाटू लागले. त्याच्याकडून केलेली आर्थिक मदतीची अपेक्षाही पूर्ण झाल्यानंतर त्यालाच घेऊन तिने २१ नोव्हेंबरला नागपूर गाठले. तेथे दुसरा मित्र गुलशन (काल्पनिक नाव) याला बोलावून घेतले. दुसराही मित्र सहजतेने भेटल्यानंतर चांदणीचा आनंद गगणात मावेनासा झाला. गुलशनने तर तिला चक्क घरी नेत पत्नी व परिवाराची भेट करून दिली. तो दिवस तिने गुलशनकडेच काढल्यानंतर २२ नोव्हेंबरला नागपुरात माझा पोलिस मित्र राहतो, असे सांगून त्यालाही बोलावून घेतले.
त्या तिघांची नागपुरातील एका बगीच्यात तब्बल चार तास गप्पा चालल्यानंतर तो पोलिस मित्र राहुल (काल्पनिक नाव) निघून गेला. चांदणीला आता गुलशनशिवाय कोणाचाही आधार नव्हता. पण, तिला हेही माहिती होते की, मित्र हा सदैव मदतीकरिता पुढे येतोच. म्हणून तिने गुलशनच्या मदतीने अजनीत भाड्याने खोली करून घेतली. घर सोडताना चांदणीने आधीच आर्थिक संकटांचा विचार केला होता. त्यामुळे खोली मिळताच तिने घरातील सर्वच वस्तूही खरेदी करून एकटीच खोलीत राहू लागली. दरम्यान, तिने चौथा मित्र रामदास वय ५३ (काल्पनिक नाव)रा. साकोली याच्याशी भेटायचा प्लॉन आखला, पण तो आज भेटू, उद्या भेटू म्हणून असे सांगून टाळत राहिला. भाड्याच्या खोलीत राहणार्‍या चांदणीच्या भेटीला गुलशन हा नेहमीच यायचा.
हरवलेल्या पत्नीचा शोध लागला का, याच्या चौकशीकरिता आकाश नेहमीत पोलिसांच्या भेटी घ्यायचा. पत्नी चांदणी ही अजनी परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांना पक्के कळले होते. त्यांनी दोन रात्र त्या परिसरात शोधमोहीमही राबविली पण, निश्‍चित पत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांनी राहुलला ताब्यात घेत अजनी गाठली. तेथेच राहुलच्या मोबाईलवरून गुलशनला फोन करून भेटण्याची इच्छा सांगितली. राहुलला विश्‍वासात घेत पोलिसांनी रचलेला सापळा तंतोतंत खरा उतरला. शनिवारी (ता. १५) रात्री साडेसात वाजता राहुलला भेटण्यास गुलशन निश्‍चित स्थळी येताच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चांदणीची खोली गाठली. तेथून चांदणीला ताब्यात घेऊन अजनी ठाण्यात घटनेचा उलगडा झाला.
घडलेले प्रकरण हे फेसबुकवरील मित्राच्या भेटीसाठीच झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चांदणीला १८ दिवसांनंतर तिचे पती आकाशच्या स्वाधीन करण्यात आले. हम दिल दे चुके सनम, या चित्रपटातील कथेप्रमाणे पोलिसांनी या प्रकरणाचा शेवट केला. तत्पूर्वी पोलिसांच्या चौकशीची ओळख फेसबुकवरील मित्रांना चांगलीच झाली. फेसबुकचा गैरवापर केल्यास कसे परिणामाला समोरे जावे लागते, याचा प्रत्यय त्या मित्रांना चांगलाच आला असेल. ही कारवाई पोलिस अधीक्षक बसवराज तेली, नीलेश मोरे, पीयूष जगताप, ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शत सहायक फौजदार सुरेश दुर्गे, संजयसिंग सूर्यवंशी, नागनाथ कुंडगिर यांनी केली.

No comments:

Post a Comment