जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा 21 डिसेंबरपासून सुरू होत असून यात्रेसाठी प्रशासन व श्री यल्लामादेवी देवस्थान ट्रस्ट आणि जत नगरपरिषद सज्ज असून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
रविवारी 21 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून यादिवशी भाविक नवस फेडण्यासाठी येतात. देवीला गंध ओटी भरतात. 22 रोजी भाविक देवीला नैवेद्य वाहतात. तर तिसरा दिवस हा कीचाचा दिवस असतो. या दिवशी (दि.23) विविध देवांच्या पालक्या मंदिराभोवती फेऱ्या मारतात.भाविक यावेळी पालक्यांवर खारीक खोबऱ्याची उधळण करतात. देवीचा पुजारी कीचातून प्रवेश करतो. यानंतर यात्रेची सांगता होते .देवीचा दरवाजा बंद होतो. हा दरवाजा अमावसया दिवशी उघडतो. या दिवशी पुन्हा यात्रा मोठ्या उत्साहात भरते. तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक यादिवशी मोठ्या प्रमाणात यात्रेला हजेरी लावतात.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष शार्दुलराजे डफळे यांनी सांगितले की या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतून लाखो भाविक येतात. यासाठी प्रतिष्ठानने विविध सोयी केल्या आहेत. तहसील कार्यालय आणि जत नगरपरिषद यांचीही मोठी मदत मिळाली आहे. शौचालये, पाण्याची सोय करण्यात आली आहे. पोलिसांचा यात्रेत मोठा बंदोबस्त आहे. आरोग्य सेवा उपलब्ध आहे.
प्रशासन आणि प्रतिष्ठान यांची नुकतीच बैठक झाली यात विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये वाहतुकीची समस्या, ‘महावितरण’, बांधकाम विभाग, जत नगरपालिका आदी विभागांनी केलेल्या कामाची चर्चा करण्यात आली. यात्रेसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून यामध्ये गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, एसटी आगार व्यवस्थापक, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक आदींची कमिटी करण्यात येणार असल्याचे सांगून जत पोलिसांनी यात्राकाळात प्रत्येक चौकात चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था निरखावी, असे आवाहन यावेळी केले. यात्रेतील मेवामिठाई व खाद्यपदार्थ विक्रेर्त्यांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडून नोंदणी करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी श्री यल्लामादेवी ट्रस्टचे अध्यक्ष शार्दुलराजे डफळे, तुकाराम महाराज, मुख्याधिकारी अभिजित हराळे, गणपतराव कोडग, प्रा. कुमार इंगळे, मोहनराव पाटील, बारीष शिंदे, मंडलाधिकारी संदीप मोरे, तलाठी घाडगे, पापा सनदी, नितीन शिंगाडे, जी. एल. शेट्यापघोळ, श्री काळबांदे, विक्रम ङफळे, संग्राम शिर्के, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment