Thursday, December 26, 2019

शालेय पोषण आहारात शिवशाही थाळीचा समावेश करा

जत,(प्रतिनिधी)-
शासनाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या आहारातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारास आळा घालण्यासाठी या विद्यार्थ्यांना शिवशाही थाळीचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे शिक्षक  नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामीण भागात शाळेत बचत गटातील महिला स्वयंपाकी मार्फत अन्न शिजवून आहार दिला जात आहे. मात्र, यासाठीसुद्धा शिक्षक व मुख्याध्यापकांना सतत लक्ष द्यावे लागते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याची योजना राज्यात राबविण्यात येत आहेत. या योजनेकरिता मुख्याध्यापक व शिक्षकांना बराच वेळ देऊन अशैक्षणिक कामे करावी लागतात. एवढेच नव्हे तर अनेक मुख्याध्यापकांना व शिक्षकांना प्रशासकीय कारवाईलाही सामोरे जावे लागते. सध्या शहरी क्षेत्रातील मनपा व नगर परिषद शाळांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून आहार पुरविण्यात येतो.
निवेदनानुसार, या योजनेतील भ्रष्टाचार व गैरव्यवहारास आळा बसू शकेल, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्याकरिता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याऐवजी गरजू व इच्छुक विद्यार्थ्यांना शिवशाही थाळी घेण्यासाठी दररोज दहा रुपये अनुदान दिले जावे. अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. सध्याच्या सरकारच्या वचननाम्यात शिवशाही थाळीचा समावेश आहे. या योजनेचा शाळास्तरावर विस्तार केला जावा. किमान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिवशाही थाळी योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी श्री. ऐनापुरे यांनी मागणी केली आहे.

1 comment:

  1. 👍👍🙏चांगला विचार आहे सर हा. योजना राबविण्यात यावी. धन्यवाद

    ReplyDelete