Saturday, December 21, 2019

जतची यल्लमा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू

हजारो भाविकांनी फेडला नवस;लाखभर भाविकांनी घेतले दर्शन
 जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला काल शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या मुख्य दिवसातील आजचा हा पहिला प्रमुख दिवस गंधोटगीचा होता. हजारोंच्या संख्येने भाविकांनी गंध लेवून देवीची ओटी भरली व आपला नवस फेडला. आज दिवसभरात हजारो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.
नवसाला पावणारी देवी म्हणून जतची श्री यल्लमा देवी सर्वदूर प्रसिद्ध आहे. आपले कार्य विनासायास सफल व्हावे म्हणून भाविक देवीला नवस बोलतात. आपली कार्यसिद्धी झाल्यास या दिवशी भाविक देवीच्या दारात येऊन नवस फेडतात. येथील कुंडात स्नान करून भक्तीभावाने देवीची ओटी भरली जाते. यात्रा स्थळावर भाविकांसाठी पिण्यासाठी व स्नानासाठी कुंडात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

यात्रा स्थळावर भाविकांची मोठी गर्दी होत असून भाविक लाखोच्या संख्येने दाखल होत आहेत.जत तालुक्यासह मुंबई,पुणे, बेंगळूर, बेळगाव, धारवाड,इंडी,बिदर,सोलापूर आदी परिसरातील भाविक मुक्कामाला येत असतात. तीन दिवस मुक्काम करत दुसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून झाल्यावर तिसऱ्या दिवशी  किच पडल्यानंतर भाविक यात्रा स्थळ सोडतात. जवळपास चार लाखाहून अधिक भाविक यात्रेला हजेरी लावत असतात. यात्रा स्थळावर मेवा-मिठाईच्या दुकानांसह सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तू,गरम लोकरीचे कपडे,खेळणी, हॉटेल्स,चायनीज पदार्थ,रसवंतीगृहे आदींची दुकाने,स्टॉल्स थाटली गेली आहेत. करमणुकीच्या साधनांमध्ये पाळणे,डिज्नेलँड,मौत का कुआ,जादूगार,तमाशे दाखल झाले आहेत.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री यल्लमा प्रतिष्ठान आणि स्थानिक प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या मागर्शनाखाली यात्रेची चोख व्यवस्था बजावली जात आहे. पापा सनदी, मोहन मानेपाटील, श्रीकृष्ण पाटील,  गणपत कोडग, कुमार इंगळे, अरुण ऊर्फ बारू शिंदे, श्री. गायकवाड, राहूल जाधव, संग्राम शिर्के, अनिल शिंदे, चंद्रकांत कोळी, सुमित कोडग, मेजर सुनिल चव्हाण, विक्रम डफळे, पापा सनदी, सलीम गवंडी आदी मंडळी यात्रेचे व्यवस्थापन पाहात आहेत.

No comments:

Post a Comment