Sunday, December 8, 2019

थोर व्यक्तींच्या चरित्रांची युवा पिढीने पारायणे करावीत

प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे
जत,(प्रतिनिधी)-
आजच्या युवापिढीचे वाचन कमी असून त्यांनी आपल्या आयुष्याची जडणघडण करण्यासाठी थोरामोठ्यांच्या चरित्रांची पारायणे करावीत असे मनोगत राजे रामराव महाविद्यालय, जतचे  प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयातील महाराष्ट्र विवेक वाहिनी विभाग व श्रीमंत विजयसिंहराजे डफळे ज्ञानस्त्रोत केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

डाॅ. ढेकळे पुढे म्हणाले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व मानवतेवर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती करून  दिनदलित जनतेला अस्पृश्यतेच्या गर्तेतून बाहेर काढून समानतेचा अधिकार दिला. तसेच देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता, व्यक्ती स्वातंत्र्य व स्वाभिमानी जीवन पध्दतीने भारतीय संस्कृतीला गौरवान्वित केले. म्हणून त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणतात. तसेच स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळात कायदे मंत्री म्हणून स्त्री उद्धारासाठी अनेक कायदे केले.
क्रांतीसिंह नाना पाटील यांनी म. गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन भारत छोडो आंदोलन व असहकार चळवळीत सक्रिय झाले. परंतु म. गांधीच्या अहिंसेचा  मार्ग न पत्करता ब्रिटिशांच्या मदतीसाठी हेरगिरी करणारे पोलीस पाटील व तलाठी यांच्या पायात पत्र्याची नाल मारून नाना पाटील यांनी पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग राबवून दहशत निर्माण केली. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर दोन वेळा लोकसभेत खासदार म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्न संसदेत मांडून न्याय मिळवून दिला. अशा थोर व्यक्तीच्या चरित्रांची युवा पिढीने पारायणे करावीत असे शेवटी डाॅ. ढेकळे यांनी आवाहन केले.
       प्रास्ताविक डाॅ. राजेंद्र लवटे यांनी केले तर आभार प्रा. अभय पाटील यांनी मानले. यावेळी सर्व गुरूदेव कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment