सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टपाल विभाग आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहे. मोबाइल, इंटरनेट, सोशल साइट यामुळे पत्र लिहिण्याचे प्रमाण हल्ली खूप कमी झाले आहे. यामुळे इंग्रजांच्या काळापासून अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या टपाल पेट्यांचे अस्तित्व राहणार की नाही याबाबत साशंकता आहे.
पूर्वी दळणवळण व संपर्कासाठी देशभरातील सर्वांना टपाल सेवेवरच अवलंबून रहावे लागत असायचे. त्यावेळी टपालाची व्यवस्था सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग होता. टपाल गावागोव पोहोचविण्यासाठी प्रत्येक ठिकाणी टपालपेट्या अस्तित्वात होत्या. मात्र सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी प्रसारामुळे इंटरनेटवरील फेसबुक, आकरुट व अन्य सोशल वेबसाइटस्मुळे, मोबाइलवरील एसएमएस, एमएमएस या तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे पत्र लिहिण्याचे कष्ट आज कोणीही घेत नाही. जलद व वापरण्यास सोपी असलेल्या सेवेचा उपयोग करण्याचा नागरिकांचा कल आहे.
मोबाइलच्या एसएमएस व एमएमएसद्वारे तसेच संवादाद्वारे क्षणार्धात संपर्क होत असल्यामुळे जागोजागी दिसणाऱ्या टपालपेट्या लुप्त होत आहेत. कमी वेळ, कमी खर्च, यामध्ये या सेवा उपलब्ध होत असल्याने टपालाच्या सेवेवर परिणाम होत आहे. टपाल सेवेचा कणा असलेल्या पोस्टमनला वाड्या, वस्त्यांवर, रानोमाळ पत्र वितरीत करीत फिरावे लागायचे. आता काम कमी झाल्यामुळे पोस्टमन गावागावात आढळणे कमी झाले आहे. अनेक वर्षांपूर्वी टपाल पेट्यांची व्यवस्था लहान खेड्यामध्येही करण्यात आली होती.
आता मात्र या पेट्यांची अवस्था मोडतोड झाल्यामुळे अत्यंत दयनीय झाली आहे. पूर्वी टपाल पेट्यांची दरवस्था झाल्याच्या तक्रारी नागरिक मोठय़ा प्रमाणात करीत असायचे. आता मात्र या पेट्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. नोकर भरतीच्या वेळी अर्ज करणे, कॉल मिळविणे तसेच विमा व सरकारी कागदपत्रांची देवाण-घेवाण टपाल कार्यालयामार्फत होते. यालाही खासगी करिअरचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे याचेही प्रमाण कमी झाले आहे. या स्पध्रेच्या युगात टपाल सेवा मागे पडू लागली आहे.
काही वर्षांनी टपाल कार्यालयांचे अस्तित्व नष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको. पूर्वी महिन्याला तीन ते पाच हजारपर्यंत पत्रांची देवाण-घेवाण टपाल कार्यालयातून होत असायची. आता मात्र हे प्रमाण नगण्य झाले आहे. एका खासगी कुरिअर सेवेच्या तुलनेत टपाल कार्यालयातील पत्रांची संख्या अत्यंत कमी आहे.
No comments:
Post a Comment