अनेक खेड्यांतून थोड्याफार फरकाने उत्तररात्रीपर्यंत
हा कलाप्रकार रंगलेला असे. लोकरंजनातून नीतीचे
व संस्कृतीचे शिक्षण देणारी ही लोककला होती. या कलाकारांनी एकनाथी
भारुड, रामायणातील कथाव्यवहारातील व्यक्तिरेखा निवडून कला प्रकार
सादर केला. प्रसंगानुरुप गीते व सोंगेही घेतली जायची. सांगली जिल्ह्यात बर्याच ठिकाणी सोंगी भजन किंवा सोंगी रामायण सादर करताना
लोककलाकार दिसतात. तुरची ढवळी येथे शामराव पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब पाटील यांनी हा कलाप्रकार भक्तिभावाने
जोपासला आहे.सोंगी भजनाद्वारे संत वाड्मयाचे सादरीकरण करीत असतात.तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील जाधव मंडळी सोंगी भजनाचे उत्तम सादरीकरण करतात.
चोपडीवाडी व सोनी येथील लाला मास्तर यांनीही हा लोककला प्रकार अतिशय
वैशिष्ट्यपूर्णपणे हाताळला. कवलापूर येथील दिलीप झेंडे,
उपळावी येथील चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब शिंदे,
कुपवाड येथील सुतार हवालदार आदी कित्येक लोककलाकारांची नावे सांगता येतील.मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील सोंगी रामायणाने अनेक राज्याचा दौरा करून
ही लोककला देशाच्या नकाशावर नेली.
या गावाने अतिशय वेगळ्या पद्धतीने
सोंगी रामायण केले. अक्षरश: वेड म्हणून
कलाप्रकार जपला. सारे गावच रामायण झाले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांच्या तोंडात रामायण आहे. रामायणाच्या गप्पा निघाल्या की प्रत्येकजण आपल्या आठवणी जागवताना दिसतो.
सुमारे 200 वर्षांपूर्वी मौजे डिग्रज या गावी करंजवडे गावचे महादेव
महाराज या गावी यायचे. कथा, प्रवचने सांगायचे.
पांडव प्रताप, रामायण या ग्रंथांचे विवेचन करायचे.
हीच मौजे डिग्रजच्या सोंगी रामायणाची पहिली सुरुवात ठरली. महादेव महाराज व जुन्या जमान्यातील गणपती साळुंखे, श्रीपती
साळुंखे, विठोबा भोसले, शिवगोंडा बिरनाळे,
शामराव भोसले यांनी महानुभव पंथाचे संस्थापक श्रीधर स्वामी यांचे रामविजय
कथासार हा ग्रंथ सोंगी भजनासाठी निवडला. त्याचा अभ्यास केला.
ग्रंथाच्या आधारे ओव्या, पदे, संवाद तयार केले. पेटी,पकवाज,
टाळ या वाद्य साहित्याद्वारे मांडनी केली. चाली
दिल्या. तालमी घेतल्या आणि पाहता पाहता रामायण तयार झाले.
पण एक अडचण आलीच. या ग्रंथात अनेक ठिकाणी लोककथांचा
वापर मोठ्या खुबीने केला आहे. सीतेला त्रास देणारा कावळा.
माणसाच्या मनात येणारा विकल्प म्हणजे जटायू अशा संकल्पनांचा वापर केला
आहे. मोर, अनेक राक्षस, वानरसेना, रावणाची दहा तोंडे, सोनेरी
मृग अशा अनेक पात्रांचा रामायणात वावर आहे. त्यामुळे मुखवट्याची
आवश्यकता भासू लागली. गावातील अण्णा कोळी या मुख्या बहिर्या पण प्रत्येक कामात पुढे असणार्या कलावंताने मुखवटे
तयार केले. आणि एकदाची तयारी झाली. बसवेश्वर मंदिरापुढे रामायणाचा प्रयोग होणार होता. पलित्याच्या
प्रकाशात, साडी घोंगड्याच्या वेशात, टाळ-मृदुंगाच्या तालात दोनशे वर्षांपूर्वी दणक्यात रात्रभर प्रयोग झाला.
जणू सारा गाव राममय झाला. त्यानंतर गावच रामायणमय
झाले.
गावचे रामायण प्रसिद्ध पावले. अनेक गावातून निमंत्रणे येत राहिली. दिवटीच्या मंद प्रकाशात फक्त जेवण व नारळ एवढ्या मोठ्या मानधनावर प्रत्येक
गावात सात-सात दिवस रामायण होत होते. राम
राज्याभिषेक, वनवास, वनवासातील अंगावर शहारे
आणणारे प्रसंग, सुवर्णमृग, सीता शोध,
लंकादहन, रावण वध असे कितीतरी रसिकाला खिळवून ठेवणारे
प्रसंग व्हायचे. यातील राम-सीता,
लक्ष्मण, रावण मस्तपैकी पदे आळवित असत.
रामायण एवढे सुरेख की पुढे तिसर्या पिढीत लोककलेचे
अभ्यासक अशोकजी परांजपे यांनी 10 दिवस मौजे डिग्रजमध्ये कॅमेर्यासह मुक्काम ठोकला. गावात पिढीबरोबर रामायण पुढे सुरू
राहिले.. शामराव भोसले मास्तर झाले.श्रीपाद
देवराये, विश्वनाथ कुंभार, सीताराम चव्हाण, मारुती सकपाळ, शामराव बंडगर यांनी काही काळ धुरा सांभाळली. काळानुरुप
बदल झाले. मानधन वाढले. माईक आले.
मेकप, ड्रेपरी नवीन झाले. कथानक, संवाद, ओवी, पदे तीच राहिली. दिलदार कोळी, मोहन
डिसले, दादासाहेब पाटील, श्रीपाल सावंत,
बाळासाहेब साळुंखे, सुरेश हिरुगडे या नव्या चमूने
जबाबदारी स्वीकारली. अशोकजी परांजपे यांची गावावर मर्जी बसली.
भोपाळ, आयोध्या, नाशिक,
मुंबई, पुणे आदी ठिकाणी शासनामार्फत महाराष्ट्र
आणि महाराष्ट्राबाहेरही कार्यक्रम केले. परदेशातही रामायण नेण्याचा
मनोदय अशोकजी परांजपेंनी बोलून दाखवला होता.
कधीकाळी या लोककलेने महाराष्ट्राचे लोकजीवन
व्यापले होते. नीतीचा व सदाचाराचा उपदेश करणारी
ही लोककला वैभवाच्या शिखरावर होती. आता केवळ उपचारापुरते या लोककलेचे
अवशेष आहेत. काळाचा महिमा इतका महान आहे.-प्रा. दिलदार कोळी
No comments:
Post a Comment