Saturday, January 4, 2020

गायक जे.एल. रानडे

सांगली शहरातील राममंदिर ते शासकीय रुणालयाच्या रस्त्यावरील हे घर आता नवा साज ल्यालं आहे. याच घरात राहिलेल्या जनार्दन लक्ष्मण ऊर्फ जे. एल. रानडे यांचा जन्म इचलकरंजीचा २७ मार्च १९०५ चा. पौराणिक कथांतील गीते म्हणणाऱ्या आपल्या जे.एल.रानडे आईकडूनच संगीताचे धडे घेतलेल्या रानडे यांना वडील गेल्यानंतर सांगलीला यावं लागलं. इथल्याच सिटी हायस्कूलात त्यांच शिक्षण झाले. ते सुरू असतानाच त्यांनी सुरवातीला मोरोबा गोंधळी आणि नंतर दि. रा. गोडबोले गुरुजींकडून संगीताचे धडे घेतले. याच काळात कृष्णाजी बल्लाळ देवल, सी क्लेमंट्स आणि भातखडे यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि नंतर नोकरीसाठी म्हणून ते अहमदनगरला गेले.
तिथल्या जिल्हा न्यायालयात १९२७ ते १९५९ अखेर नोकरी केली. तेव्हा त्यांचे जिल्हा न्यायाधीश होते सी.क्लेमंदस. ही नोकरी सुरू होती तेव्हाही ते दर शनिवारी पुण्यास येत ते केवळ गाणे शिकण्यासाठी. पं. विनायकबुवा पटवर्धन हे त्यांचे पुण्यातील गुरू. आकाशवाणी आणि ग्रामोफोन कंपन्यांचा तो बहारीचा काळ. रानडे यांचा आवाज सुरेल आणि ताना दाणेदार. मग ते बालगंधर्व आणि गोविंदराव टेंबे यांची शिफारसपत्रं घेऊन मुंबईत गेले. आकाशवाणीत दिनकर अमेबल आणि बुखारी यांना तर ग्रामोफोन कंपनीत रमाकांत रूपजी आणि जी. एल. जोशीना भेटले आणि भावगीत गायक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. २४ डिसेंबर १९३३ मध्ये आकाशवाणीवर ते पहिल्यांदा गायले तर १९३४ मध्ये त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. मग त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. शास्त्रीय सुगम शास्त्रीय आणि मराठी भावगीतांच्या वैविध्यपूर्ण ध्वनिमुद्रिका त्यांनी रसिकांना दिल्या. 'अति गोड गोड ललकारी', 'कलिका गोड नाचे छुमछुम', 'गोड गोड मुरली सखे गे', 'फुलल्या कळ्या प्रेमाच्या', नभी हसली चंद्रिका चकोरा', 'नवल ही बासरी', 'आज सखी श्यामसुंदर', 'राहा उभी तशीच गं', 'वैरीणही रजनी प्रियाविण' ही त्यातील अंत्यत गाजलेली गाणी. सदाशिव अनंत शुक्ल, ग. दि. माडगूळकर, मामा वरेरकर, रा. ना. पवार, मा. ग. पातकर, बाबूराव गोखले हे त्यांचे गीतकार होते. त्यांच्या गायनाच्या मैफिलींची जाहिरात मोठी असे. अशा जाहिरातीमधून त्यांच्या 'डोळे तुझे शराबी' आणि 'घायाळ मी शिकारी' या गीतांचा खास उल्लख असे. १९३४ ते १९५२ या काळात एच. एम. व्ही. कंपनीने त्यांच्या पन्नासहून अधिक ध्वनिमुद्रिका काढल्या. यातील भावगीतांसाठी रानडे यांचा शब्द होता 'भावपदे'.
रानडे यांच्या काळ हा शास्त्रीय संगीताचा आणि नाट्यपदांचा प्रभाव
असणारा काळ. अशा काळात रानडे यांची भावगीतं रसिकांसमोर आली. उत्तम शब्दरचना, काव्यातील उत्कट कल्पना आणि शास्त्रीय रागांचा आधार ही रानडे यांची बलस्थानं होती. त्यांच्या गायनात कवितेसोबत रागविस्तारही। असे, कविता आणि गाणं यांचा सूर जुळू लागण्याचा तो कालखंड. रानडे यांनी मराठी भावगीतांचा हा काळ गाजविला तसं वर्धाच्या 'महिलाश्रमात संगीत शिक्षकाचं कामही केलं, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचं कामही पाहिलं. भावगीतांच्या दुनियेत आपला वेगळा ठसा उमटवून गेलेल्या या गायकानं वयाच्या ९२ व्या वर्षी १९९७ मध्ये या जगाचा निरोप घेतला. ज्या गाण्यामुळं त्यांना अफाट लोकप्रियता लाभली त्या गाण्याची आठवण म्हणून त्यांनी सांगलीतल्या घराला 'ललकारी' हे नाव दिलं. रानडे यांच्या ' ललकारी' या भावगीताला वेगळी उंची मिळवून दिली असली तरी त्यांची आठवण काढावी असं या सांगलीत आज काहीही नाही.'-सदानंद कदम

No comments:

Post a Comment